उत्तर प्रदेश विधानसभेवर लक्ष केंद्रित करण्याची पक्षनेत्यांची मुलायमसिंहांकडे मागणी
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशच्या २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता कायम राखण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि ‘जनता परिवाराच्या’ माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात पाय रोवण्याची योजना सध्यापुरती थंड बस्त्यात ठेवावी, अशी मागणी पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी मुलायमसिंह यादव यांच्याकडे केली आहे.
बिहारमधील जागावाटपाच्या मुद्दय़ावर महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने या सल्ल्यानंतरच घेतला, अशी माहिती आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप व बसप यांच्या पराभवावर लक्ष केंद्रित करण्यावर समाजवादी पक्षाचा रोख असावा आणि एका मोठय़ा आघाडीचा भाग राहून हे शक्य होणार नाही, असे रामगोपाल यादव आणि मोहम्मद आझम खान या दोन नेत्यांचे मत होते, असे पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. जनता परिवाराच्या ऐक्याच्या प्रक्रियेत स्वत:ची ओळख हरवून बसणे समाजवादी पक्षाला परवडणार नाही, कारण त्यामुळे आपली यादव-मुस्लीम मतपेढी धोक्यात येईल, असे या दोघांनी सांगितल्याचे कळते.
जनता परिवाराचा भाग बनून संसदेत मोठा पक्ष म्हणून उदयाला येण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे सध्या फारसे काही साध्य होणार नाही, याबाबत मुलायमसिंह यांचे मन वळवण्यात या दोन नेत्यांना यश आल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे जबरदस्त नुकसान होऊन त्यांना फक्त पाच जागा मिळवता आल्या होत्या. उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत २७ मे २०१७ रोजी संपत आहे.
जनता परिवारातील पक्षांनी एकत्र येण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे, आता तुम्ही केवळ विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काम करा, असा सल्ला या दोन नेत्यांनी मुलायमसिंह यादव यांना दिला. सध्याची परिस्थिती कायम राहिली तर पक्षाची निवडणुकीत धूळदाण होईल, असे मुलायमसिंह यांनी अलीकडेच पक्षाच्या एका बैठकीत म्हटले होते.
समाजवादी पक्ष पुन्हा महाआघाडीत परत येईल याची खात्री देण्याबाबत मुलायमसिंह यांनी सतत नाखुशी दाखवली असली, तरी जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना मात्र ही नवजात आघाडी वाचेल अशी आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा