समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांची सून अपर्ण यादव ‘पद्मावती’ चित्रपटातील गाण्यावर नृत्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ‘घुमर’ या गाण्यावर नृत्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांना अनेकांकडून धमक्याही दिल्या जात आहेत.

अपर्णा यांचा भाऊ अमन बिष्ट याचा लखनऊमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा झाला. या कार्यक्रमात अर्पणा यांनी घुमर या गाण्यावर नृत्य केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. अपर्णा यादव ज्या घराण्याची सून आहेत, त्यांना हे शोभत नाही, असे त्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. हा चित्रपट आणि त्यातील गाण्यावरून राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे करणी सेनेचे म्हणणे आहे. राजघराण्यातील स्त्रिया अशाप्रकारे नृत्य करत नाहीत, असे म्हणत त्यांनी ‘घुमर’ या गाण्यावर आक्षेप घेतला होता. या गाण्यावर नृत्य करत आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही त्यांनी म्हटले.