Mulayam Singh Yadav Died at 82 PM Modi Condolence Tweet: मागील आठवड्याभरापासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या मुलायम सिंह यादव यांची प्राणज्योत आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास मालवली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक तसेच माजी अध्यक्ष असलेल्या मुलायम सिंह यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहेत. राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीटरवरुन मुलायम सिंह यांनी कायमच देशहिताचा विचार केल्याचं नमूद करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी तीन ट्वीटमधून मुलायम सिंह यांच्यासमवेत आठ फोटो ट्वीट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या मुलायम सिंह यादव यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासमवेत दोन फोटो ट्वीट केले आहेत. या ट्वीटला दिलेल्या कॅप्शनमध्ये मोदींनी आणीबाणीपासून ते मुलायम संरक्षणमंत्री असेपर्यंतचा उल्लेखही केला आहे. पंतप्रधान मोदींनी, “मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशच्या आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आणीबाणीच्या कालावधीमध्ये ते लोकशाहीसाठी लढणारे महत्त्वाच्या नेतृत्वांपैकी एक होते. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी सक्षम भारत घडवण्यासाठी काम केलं,” असं म्हटलं आहे.

तसेच, “त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केलेले मुद्दे हे फारच अभ्यासपूर्ण असायचे. तसेच हे मुद्दे राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असायचे,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवरुन दिलेल्या शोक संदेशामध्ये म्हटलं आहे. मागील आठ दिवसांपासून मुलायम यांच्यावर उपचार सुरु असताना पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाकडून मुलायम यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून आरोग्यासंदर्भातील माहिती घेतली जात होती.

“मुलायम सिंह यादव हे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्त्व होतं. लोकांच्या समस्यांबद्दल संवदेनशिलता असणारा नेता म्हणून ते राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जायचे. त्यांनी लोकनायक जय प्रकाश आणि डॉक्टर लोहिया यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच लोकांची सेवा करण्यासाठी स्वत:चं आयुष्य वाहून घेतलं,” असंही मोदींनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“आम्ही आमच्या आमच्या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदावर असताना मला मुलायम सिंह यांच्यासोबत अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यानंतर आमचे संबंध कायमच फार जवळचे राहिले. मी कायम त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो. त्यांच्या निधनामुळे फार दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती आणि लाखो समर्थकांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती,” असं मोदींनी अन्य एका ट्वीटमध्ये मुख्यमंत्री असतानाचे जुने फोटो ट्वीट करत म्हटलं आहे.

मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. राज्यातील राजकारणामधील महत्त्वाचे नेतृत्व म्हणून त्यांनी मागील तीन दशकं गाजवली. या कालावधीमध्ये ते तीनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान पार पाडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulayam singh yadav death pm modi condolence with emotional tweets scsg
Show comments