Mulayam Singh Yadav Died at 82: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
नक्की वाचा >> मुलायम यांच्या निधनाने मोदीही हळहळले! मुलायम यांच्यासोबतचे आठ फोटो पोस्ट करत म्हणाले, “मी कायम त्यांची मतं…”
मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
पाहा व्हिडीओ –
पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. २९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला.
उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर हे पद जॉर्ज फर्नान्डिस यांनी संभाळलं.