समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे दहशतवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा अडचणीत सापडले. वर्मा यांची तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेचे कामकाज रोखले.
खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी सुमारे दोन तासांसाठी तहकूब करण्यात आले. वर्मा यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, अशी मागणी खासदारांनी लावून धरली.
शून्यकाळात समाजवादी पक्षाचे खासदार शैलेंद्रकुमार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत, या आरोपाबद्दल वर्मा यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आपण असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचा खुलासा वर्मा यांनी केला. मुलायमसिंह यांच्यावर मी आरोप केल्याचा कोणताही पुरावा समाजवादी पक्षाच्या खासदारांकडे नाही. त्याचबरोबर दहशतवादाचा मी कोणत्याही धर्माशी संबंध जोडलेला नाही, असे स्पष्ट करून वर्मा यांनी याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिला. वर्मा यांच्या खुलाशानंतरही समाजवादी पक्षाचे खासदार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Story img Loader