पीटीआय, सैफेई : समाजवादी पक्षाचे संस्थापक, माजी संरक्षण मंत्री, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी त्यांच्या उत्तर प्रदेशमधील जन्मगावी सैफेईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जमलेल्या मोठय़ा जनसमुदायाने आपल्या नेताजींना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. या वेळी सर्वपक्षीय प्रमुख नेते उपस्थित होते. गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात मुलायमसिंह यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांचे पार्थिव सैफेई येथे आणण्यात आले होते.
सैफई मेळा मैदानावर या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य व ब्रजेश पाठक, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेचे नेते प्रफुल्ल पटेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव प्रकाश करात आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी आदी मान्यवरांनी या वेळी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
उद्योगपती अनिल अंबानी, यादव यांचे बंधू आणि प्रगतिशील समाजवादी पक्षाचे (लोहिया) संस्थापक शिवपाल यादव, उत्तर प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी, शेतकरी नेते राकेश टिकैत, आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह, ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन, अभिषेक बच्चन, भाजप नेत्या रिटा बहुगुणा जोशी, योगगुरू बाबा रामदेव यांनीही अंत्यसंस्कारास उपस्थित राहून मुलायमसिंह यांचे पुत्र व समाजवादी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सांत्वन केले. मुलायमसिंह यांचे पार्थिव सोमवारी संध्याकाळी सैफेई येथे आणून त्यांच्या निवासस्थानी ठेवले होते. त्यांच्या हजारो समर्थकांनी तेथे जाऊन अंत्यदर्शन घेतले.