अन्नसुरक्षेबाबत अध्यादेश काढून काँग्रेस मतांचे राजकारण करीत असून त्या पक्षाचा हेतू चांगला नाही, अशी टीका सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी केली आहे.
लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागलेल्या असताना गेल्या वर्षी काँग्रेसने मनरेगा ही ग्रामीण रोजगार योजना आणली त्याचप्रमाणे आता अन्नसुरक्षा अध्यादेश काढला आहे. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच अध्यादेश काढण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
अन्नसुरक्षा अध्यादेश काढणाऱ्या काँग्रेसचा हेतू चांगला नाही, त्यामुळे आपला पक्ष शेतकऱ्यांच्या हिताला बाधा निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू देणार नाही. काँग्रेस केवळ मतांचे राजकारण करीत आहे, असा आरोपही मुलायमसिंग यादव यांनी केला.
जवळपास पाच लाखांहून अधिक लोक उपासमारीमुळे दगावले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण अधिक आहे, तेव्हा सरकारने तेथे अन्नधान्याचे वाटप का केले नाही, असा सवालही त्यांनी केला. देशभरात काँग्रेसची स्थिती ठीक नाही आणि अध्यादेश हा केवळ प्रचार आहे, असेही ते म्हणाले.
संसदेचे अधिवेशन आता सुरू होणार असून, त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाईल. अन्नसुरक्षा अध्यादेशाबद्दल आपल्या पक्षाची काही भूमिका आहे आणि ती आपल्याला स्पष्ट करावयाची आहे. या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जाईल का, हेही आपल्याला स्पष्ट करावयाचे आहे, असेही ते म्हणाले.
अध्यादेशाबाबत सपाही जागरूक आहे आणि शेतकरीही जागरूक आहेत, आम्ही संपूर्ण अध्यादेशाचा अभ्यास करून आवश्यक ती पावले उचलू, असेही ते म्हणाले. जातीय शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे, आम्ही यूपीएचा घटक पक्ष नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा