केवळ खुशमस्करी करीत राहून उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारची प्रतिमा मलिन करू नका, असा सज्जड दम सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिला आहे. इतकेच नव्हे, तर कठोर प्रशासक बना, असा सल्ला त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना दिला.
सरकार लवचिक धोरणांमुळे नव्हे, तर कठोर भूमिकेमुळे चालते, याचे अखिलेश यादव यांनी भान ठेवावे, असे मुलायमसिंग यांनी म्हटले आहे. राम मनोहर लोहिया यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिलेश यादव सरकारच्या कारभाराबाबत मुलायमसिंग यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. मंत्री आळसावले आहेत आणि अधिकारी केवळ खुशमस्करी करून आपले काम करून घेण्यात दंग आहेत. यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे आणि असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असेही मुलायमसिंग यांनी म्हटले आहे.
पोलीस ठाणी आणि तहसील कार्यालये हे भ्रष्टाचाराचे मोठे अड्डे बनले आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकारांचा आढावा घेऊन जेथे अनियमितता आढळेल तेथील जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस प्रमुखांवर कारवाई करण्याचे संकेत मुलायमसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
अडवाणींच्या वक्तव्याशी सहमत
मुलायमसिंग यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारवर टीका करण्यासाठीही मुलायमसिंह यांनी अडवाणी यांच्याच वक्तव्याचा आधार घेतला.
उत्तर प्रदेश हे सर्वात वाईट राज्य असून तेथे भ्रष्टाचार बोकाळला आहे, असे अडवाणी यांनी म्हटले आहे. अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने असे केल्याने आता आपल्याला स्थितीचा आढावा घ्यावा लागेल कारण अडवाणी कधीही असत्य बोलत नाहीत. ते नेहमीच खरे बोलतात आणि त्यामुळे आता आपल्याला त्यांची भेट घ्यावीच लागेल, असे मुलायमसिंह यांनी म्हटले आहे.

Story img Loader