नवी दिल्ली : राज्यातील उद्योगांना व रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी जालन्याप्रमाणे नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सांगली, भिवंडी, पुणे आदी जिल्ह्यांमध्येही मल्टी-लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
दोन-तीन जिल्ह्यांसाठी मिळून एक मल्टी-लॉजिस्टिक पार्क असेल. त्यामुळे उत्पादनांच्या निर्यातीसाठी उद्योजकांना मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी फक्त राज्याला जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार असून पार्क विकसित करण्याचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीसाठी विशेष प्रयत्न
रत्नागिरी जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असून तिथल्या उद्योगधंद्यांच्या विकासाचा प्रश्नही गंभीर आहे. करोना काळात काही छोटे उद्योग बंद पडले आहेत. जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास कसा करता येऊ शकेल, यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा झाल्याचेही सामंत यांनी सांगितले. कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वेनाक्यांवर पूलबांधणी तसेच थांब्यांच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही सामंत यांनी भेट घेतली.
जालन्यातील मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी करार
मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही प्रदेशांच्या विकासासाठी जालन्यामध्ये उभारल्या जाणाऱ्या मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये बुधवारी महत्त्वाचा करार झाला. हा करार नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (एमएमएलपीएस) व जेएनपीटी यांच्यात झाला असून यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय बंदरविकासमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड तसेच, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे तसेच, खासदार हेमंत पाटील, उन्नेष पाटील, संजय जाधव, प्रीतम मुंडे, प्रतापराव चिखलीकर आदी उपस्थित होते. ‘भारतमाला परियोजने’अंतर्गत मल्टी-लॉजिस्टिक पार्क उभा केले जाणार असून जालना, औरंगाबाद या भागांतील उद्योगांना या प्रकल्पामुळे चालना मिळेल व रोजगारही निर्माण होतील. मल्टी-लॉजिस्टिक पार्क समृद्धी महामार्ग व रेल्वे मार्गाशीही जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४५० कोटींचा खर्च होणार असून हे पार्क १८२ हेक्टरमध्ये विस्तारलेले असेल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. पुढील आठ-दहा दिवसांमध्ये औरंगाबादला जाऊन तिथल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहे. या दौऱ्यात केंद्रीयमंत्री भागवत कराड व रावसाहेब दानवे हेही असतील. तिथल्या उद्योजकांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असेही सामंत म्हणाले.
‘राजकीय वातावरण दूषित करू नये!’
भूमिपुत्रांना रोजगारांमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर, राजकीय वातावरण दूषित करण्यापेक्षा उद्योगांसाठी व राज्याच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी सलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा दावा सामंत यांनी केला.
कोकणाच्या विकासाकडे लक्ष
कोकणाच्या विकासाकडे लक्ष दिले जाणार असून रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांतील बंदरांचा व जेट्टींचा विकास केला जाईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन जेट्टी असून तिथे जाण्यासाठी रस्त्यांचा विकास करण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून चार पदरी मार्ग विकसित केला जाईल. मुंबई-गोवा महामार्ग व रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाचाही विकास केला जाणार असून हे काम जानेवारीपासून सुरू होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.