दिल्लीमधील लोक नायक जयप्रकाश रुग्णालयामध्ये (एलएनजेपी) उपचार घेत असणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांवर सध्या पॅरासिटेमॉल आणि प्रथिनांचं प्रमाण वाढवणाऱ्या गोळ्यांच्या सहाय्याने उपचार केले जात आहेत. या रुग्णावर सुरु असणाऱ्या उपचारासंदर्भात रुग्णालयातील डॉक्टरांनी शुक्रवारी माहिती दिली. दिल्ली सरकारच्या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये आतापर्यंत ४० ओमायक्रॉनबाधित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १९ रुग्णांनी करोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
एलएनजेपी रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणं दिसून येत नाहीय. उर्वरित १० टक्के रुग्णांना घशात खवखव, थोडा ताप आणि अंगदुखीचा त्रास यासारखी सौम्य लक्षणं दिसत आहेत. “ओमायक्रॉनच्या या रुग्णांना उपचारादरम्यान केवळ मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांचा वापर करण्यात आलाय. या रुग्णांना इतर कोणत्याही गोळ्या देण्याची गरज आम्हाला जाणवली नाही,” असं डॉक्टरांनी म्हटलंय.
करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेले जवळजवळ सर्वच रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. यापैकी सर्वच रुग्णांनी करोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तीन चतुर्थांश व्यक्तींनी करोना लसीचा बुस्टर डोसही घेतलाय. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे एकूण ६७ रुग्ण आढळले असून त्यापैकी २३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
नक्की वाचा >> करोनाची दहशत… भारतातील ‘या’ प्रांतात महिन्याभरात विकल्या गेल्या पाच कोटी पॅरासिटेमॉल
भारतामध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजता पूर्ण झालेल्या २४ तासांमध्ये करोनाचे एकूण सहा हजार ६५० नवीन रुग्ण आढलून आले. देशामध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या ३५८ वर पोहचली आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक म्हणजे ८८ रुग्ण आहेत, दिल्लीत ६७, तेलंगणमध्ये ३८, तामिळनाडूमध्ये ३४, कर्नाटकमध्ये ३१, गुजरातमध्ये ३० ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आलेत. केरळमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या २७ असून राजस्थानमध्ये २२, हरयाणामध्ये आणि ओडिशामध्ये प्रत्येकी चार जणांना ओमायक्रॉनची बाधा झालीय. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश प्रत्येकी तीन ओमायक्रॉनचे रुग्ण असून उत्तर प्रदेशमध्ये दोन ओमायक्रॉनबाधित आहेत. याचप्रमाणे चंढीगड, लडाख आणि उत्तरखंडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा झालीय.