पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये रविवारी बॉम्बस्फोटांची मालिका घडली आहे. यामध्ये पाच पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून अन्य १० नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, क्वेट्टा येथील सबजल रस्त्यावर ग्रेनेड स्फोट करण्यात आला. यावेळी दोन ग्रेनेडही रस्त्यावर फेकले. त्यातील एका ग्रेनेडचा स्फोट झाला, तर दुसरा ग्रेनेड निकामी करण्यात आला. या हल्ल्यानंतर स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तपासाला सुरुवात केली आहे.
क्वेट्टा येथील सबजल रस्त्यावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात जवळपास चार लोक जखमी झाल्याची माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिली आहे. क्वेट्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सबजल रस्त्यावर दोन ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकण्यात आले होते. यातील एका ग्रेनेडचा स्फोट झाला तर दुसरा ग्रेनेड निकामी करण्यात आला.
हेही वाचा- अफगाणिस्तानमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण स्फोट, १९ जणांचा होरपळून मृत्यू
या घटनाक्रमानंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अब्दुल कुद्दुस बिझेन्जो म्हणाले की, पोलीस आयुक्तांना शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याआधीही पाकिस्तानात असे अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने अलीकडेच खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू शहरातील दहशतवाद विरोधी विभागाचा परिसर ताब्यात घेतला. त्याचबरोबर दक्षिण-पश्चिम सीमेवर चकमकी आणि गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.