मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रवास साहसी ठरणार आहे. कारण देशातील ही पहिली बुलेट ट्रेन मुंबईतील ठाणे-विरार टप्प्यातून जाताना सागरातील २१ कि.मी. लांबीच्या बोगद्यातून प्रवास करणार आहे. मुंबई-अहमदाबाद हे ५०८ कि.मी.चे अंतर अगदी कमी काळात पार करणारी बुलेट ट्रेन ठाणेखाडीनजीक सागराखालील बोगद्यातून जाईल असे रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी
सांगितले. जेआयसीएने या बुलेट ट्रेनचा प्रस्ताव पूर्ण तयार करून प्रकल्प अहवाल सादर केला आहे. बुलेट ट्रेनसाठी ९७,६३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या गाडीचा वेग ताशी साडेतीनशे किलोमीटर असला तरी प्रत्यक्षातील सरासरी वेग ताशी ३२० किलोमीटर असेल. ५०८ किलोमीटर अंतर ही गाडी दोन तासात कापणार आहे. सध्या दुरांतो एक्सप्रेस सात तासात हे अंतर कापते. मुंबई-अहमदाबाद रेल्वेचा बहुतांश मार्ग हा उन्नत असला तरी ठाणे खाडी ते विरार दरम्यान ही गाडी सागरी बोगद्यातून जाईल.