शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं दुबईमध्ये आकस्मिक निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी लटके हे सहकुटुंब दुबईला गेले होते तेव्हाच हा प्रकार घडला.
नक्की वाचा >> शिवसेना आमदाराचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन : वृत्त समजल्यानंतर नितेश राणे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच…”
बुधवारी रात्री अचानक लटके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रमेश लटके हे ५२ वर्षांचे होते. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, “आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिलीय.
नक्की वाचा >> दुबईत शिवसेना आमदाराचं निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं, “त्यांच्या निधनामुळे…”
२०१४ मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना पराभूत करुन लटके हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या एम पटेल यांना पराभूत केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होते.
लटके यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांच्या समर्थकांना आणि शिवसैनिकांना मोठा धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वीच लटके हो त्यांच्या कुटुंबियांसोबत दुबईला गेले होते.