मुंबई पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्यानंतर २७ दिवस पोलिसांना चकवत असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी अफजल उस्मानी (३७)याला अखेर दहशतवाद विरोधी पथकाने उत्तरप्रदेशातून अटक केली. नेपाळमार्गे पाकिस्तानात पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न होता. गेल्या २० सप्टेंबर रोजी मुंबईच्या न्यायालयातून तो फरार झाला होता. अफजलचा भाचा जावेद (१९) याला याप्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर एटीएसने अफजलचा माग काढला.
२००८ साली  सूरत आणि अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अफजल उस्मानीला पकडण्यात आले होते. त्याला तळोजा येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथून २० सप्टेंबर रोजी त्याला इतर आरोपींसह मुंबईच्या सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. तेथूनच तो पोलिसांची नजर चुकवून फरार झाला होता. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने याप्रकरणी कुल्र्याहून जावेद नूरल हसन (१९) या उस्मानीच्या भाच्याला २५ ऑक्टोबरला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसानी तातडीने हालचाली करीत उस्मानीचा माग काढला. जावेदने उस्मानीला पळून जाण्यात मदत केली होती.
असा पळाला होता उस्मानी..
न्यायालयातून पोलिसांच्या हाती तुरी ठेवून पळाल्यानंतर उस्मानीने टॅक्सी पकडली आणि थेट गेला शिवडीत. तेथे त्याने अकमल खान या त्याच्या मित्राकडून ६०० रुपये घेतले. तेथून तो धारावीत राहणारी बहीण साफिया खातून हिच्याकडे गेला. तिचा १९ वर्षांचा मुलगा जावेद नूरल हसन खान याला त्याने हाताशी धरले. रस्त्यावरच्या एका न्हाव्याकडून त्याने दाढी बारीक करून केसांचा रंग बदलला. अंगातील शर्ट फेकून जावेदने आणलेला टी शर्ट त्याने घातला. शीव येथे जाऊन त्याने पूर्ण दाढी काढून आपले रूप बदलले. बहिणीकडून ५ हजार रुपये घेतले. जावेदचे मन त्याने आधीच वळविले होते. दोघे बसने सांताक्रुझला गेले. तेथून टॅक्सी पकडून बोरिवलीला गेले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास व्होल्वो बसने ते सूरतला गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास ते सुरतला पोहोचले. तेथून ‘अवध एक्सप्रेस’ने त्यांनी गोरखपूर गाठले. ततेरा गावातील जावेदच्या बहिणीच्या सासऱ्याकडे दोघे गेले. सौदीतून आलेला मामा अशी त्याची ओळख जावेदने करून दिली होती. वसीम सत्तार खान या नावाने पासपोर्ट बनविण्याच्या तो तयारीत होता. त्यासाठी त्याने या बनावट नावाने अर्ज केला होता.
असा सापडला जावेद आणि उस्मानी
जावेद आणि उस्मानी दोघेही पाकिस्तानला पळून जाणार होते. पासपोर्टसाठी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी जावेद कुल्र्याला आल्यावर एटीएसने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यामार्फत पोलिसांना उस्मानीची योजना समजली. २५ ऑक्टोबरच्या रात्री जावेद नेपाळ सीमेवर जाणार होता. एटीएसच्या पथकाने तातडीने हालचाली केल्या. हे पथक त्याच दिवशी पहाटे तातेर गावात पोहोचले. पण उस्मानी आधीच निसटला होता. एटीएसने आधीच पूर्वतयारी करून सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या मदतीने सापळा लावला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास रूपधीया स्थानकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या उस्मानीच्या मुसक्या एटीएसने आवळल्या, अशी माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले. या २७ दिवसात जावेद आणि उस्मानी या दोघांनी कटाक्षाने मोबाईल फोन आणि दूरध्वनी वापरायचे टाळले होते. जावेदला पासपोर्ट बनवायचा होता. शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी जावेद मुंबईला आला आणि एटीएसच्या जाळ्यात सापडला होता.