मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईदने नजरकैदेतून सुटताच गरळ ओकली आहे. काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी माझा लढा सुरुच राहणार, असे त्याने म्हटले आहे. मला नजरकैदेत ठेवण्यासाठी भारताने अमेरिकेच्या मदतीने पाकवर दबाव टाकला, असा आरोप त्याने केला.

जानेवारीपासून हाफिज सईद लाहोरमधील घरीच स्थानबद्ध होता. गेल्या महिन्यात लाहोर हायकोर्टाच्या न्यायिक परीक्षण मंडळाने सईदच्या स्थानबद्धतेला महिनाभराची मुदतवाढ दिली होती. मात्र यावेळी सरकारकडे स्थानबद्धता वाढवण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे सांगत मंडळाने सईदला मुक्त करण्यात आदेश बुधवारी दिले होते.

गुरुवारी रात्री उशिरा सईदची सुटका करण्यात आली. सईदच्या घराबाहेर जमात- उद-दवाच्या समर्थकांची गर्दी झाली होती. सईदच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. समर्थकांना संबोधित करताना सईद म्हणाला, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी मी आवाज उठवला. माझा आवाज दाबण्यासाठी १० महिन्यांपासून मला स्थानबद्ध केले होते. पण काश्मिरी जनतेसाठी मी माझा लढा सुरुच ठेवणार आहे. काश्मीरसाठी मी पाकिस्तानमधील जनतेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे, असे त्याने सांगितले.

लाहोर हायकोर्टाने माझ्या सुटकेचे आदेश दिल्याने मी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. भारताने माझ्यावर निराधार आरोप केले होते, असा दावा त्याने केला. माझ्यावर कारवाई व्हावी यासाठी भारताने अमेरिकेकडे विनंती केली. अमेरिकेने पाकिस्तान सरकारवर दबाव टाकला आणि या दबावापुढे नमते घेत पाक सरकारने मला स्थानबद्ध केले, असा आरोप त्याने केला. आमच्या नेत्याची सुटका झाल्याने आम्ही आनंदात आहोत, अशी प्रतिक्रिया जमात- उद- दावाचा प्रवक्ता अहमद नदीमने दिली.

दरम्यान, हाफिजच्या सुटकेचा भारताने विरोध दर्शवला आहे. हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका करण्याच्या निर्णयावर भारताने संताप व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेल्या सईदला मुख्य प्रवाहात आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचा आरोप भारताने केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडीचे पडसाद उमटले आहेत. नऊ वर्षे लोटली तरीही अद्याप सईदवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात आलेला बिगर-नाटो मित्रदेशाचा दर्जा रद्द करण्याची वेळ आली आहे, अशी विनंती अमेरिकेतील दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रातील एका उच्चपदस्थ तज्ज्ञाने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला केली आहे.

Story img Loader