हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये व्हिसटेक्स आशिया-पॅसिफिक प्रा. लि. या कंपनीचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा होत असताना कंपनीचे अमेरिकेतील सीईओ आणि मुळचे भारतीय नागरिक असलेल्या संजय शहा यांचा एका विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच कंपनीचे अध्यक्ष विश्वनाथ राजू दातला हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, गुरुवारी रात्री व्हिसटेक्स कंपनीचा रौप्यमहोत्सवी सोहळा रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर हटके पद्धतीने येण्याचा स्टंट करताना हा अपघात झाला.
कसा घडला अपघात?
व्हिसटेक्स कंपनीने रौप्यमहोत्सवी सोहळ्यासाठी रामोजी फिल्म सिटीमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही खोल्या बुक केल्या होत्या. तसेच दोन दिवसांच्या समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी गुरुवारी सुरू असलेल्या कार्यक्रमात संजय शहा आणि राजू दातला हे मुख्य मंचावर एका लोखंडी पिंजऱ्यातून वरून खाली येणार होते. सायंकाळी ७.४० वाजता दोघांनाही पिंजऱ्यातून खाली आणले जात होते. यावेळी दोघेही पिंजऱ्यातून आपल्या कर्मचाऱ्यांना हात हलवून अभिवादन करत होते. पिंजरा हळूहळू खाली येत असताना पिंजऱ्याला जोडलेल्या दोन तारांपैकी एक तार तुटली आणि पिंजरा १५ फुटांपेक्षा अधिक उंचावरून मंचावर कोसळला. पिंजरा कोसळल्यानंतर शहा आणि दातला यांना जबर जखम झाली, अशी माहिती अब्दुल्लापुरमेट पोलिस ठाणयाचे पोलिस उपनिरिक्षक डी. करुणाकर रेड्डी यांनी दिली.
इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी उघडणार शेअर बाजाराचं दार, सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुट्टी
पिंजरा कोसळल्यानंतर ५६ वर्षीय संजय शहा आणि राजू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच शहा यांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, इतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर रामोजी फिल्म सिटीमधील इव्हेंट आयोजित करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे) आणि कलम ३३६ (मानवी जीवन धोक्यात टाकणे) सारखे कलम लावण्यात आले आहेत.
कोण आहेत संजय शहा?
मुळचे मुंबईचे असलेले संजय शहा यांनी १९९९ साली या कंपनीची स्थापना केली होती. कंपनी महसूल व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा तयार करण्यात व्हिसटेक्स बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीचा हातखंडा होता. कंपनीकडे १,६०० कर्मचारी असून वार्षिक ३०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची उलाढाल कंपनीने नोंदवली आहे. कोका कोला, जीई, डेल, सिमन्स, ॲडॉब, केलॉग्स, ॲबॉट, बेयर, यामाहा, सोनी, एनव्हिडिया, एचपी, सिस्को अशा नामांकित कंपन्या व्हिसटेक्सच्या अशील आहेत. व्हिसटेक्सचे हैदरबादसह जगभरात कार्यालये आहेत.