इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी निघालेल्या नवी मुंबईतीला एका पत्रकाराला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. जुबेर अहमद खान या पत्रकाराने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये इसिसच्या अबू बक्र अल-बगदादीशी मॅसेजवरून बोलणे झाले असून इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघणार असल्याचे नमूद केले होते. तसेच इसिसचा प्रवक्ता होण्याची इच्छा जुबेरने व्यक्त केली. वादग्रस्त पोस्टमुळे जुबेर खान मुंबई पोलिसांच्या रडारवर होता. आपण ४ ऑगस्टला राजधानी एक्स्प्रेमधून दिल्लीला पोहचणार असल्याची शेवटची पोस्ट स्वत:ला एका इंग्रजी वृत्तपत्राचा मुख्य संपादक असल्याचे सांगणाऱया या जुबेर खानने केली होती. यानंतर इराक दुतावासात जाऊन इसिसचा प्रवक्ता होण्याची इच्छा व्यक्त करू असेही लिहिले होते. जुबेरच्या फेसबुक पोस्टच्या आधारावर दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून अखेर त्याला इराक दुतावासाच्या कार्यालयातून दिल्लीच्या वसंत विहार पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण प्रकरणासंबंधी जुबेरची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.