मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याचा कथित सहकारी रियाज भाटी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रियाज भाटीने तुरुंगातूनच एका साक्षीदाराला धमकावले आहे. रियाज खंडणीप्रकरणी आधीपासूनच तुरुंगात आहे. तसंच, त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक सलीम फ्रूट आणि इतर पाचजणही तुरुंगात आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
खार पोलिसांनी भाटीविरोधात गेल्याच आठवड्यात आणखी एक एफआयआर नोंदवला. यामध्ये एका ४३ वर्षीय व्यावसायिकाने आरोप केला की, राजेश बजाज नावाच्या व्यक्तीने न्यायालयात भाटीच्या बाजूने साक्ष देण्याची धमकी दिली होती. हे व्यावसायिक बजाज यांना गेल्या १० वर्षांपासून ओळखत होते.
व्यावसायिकाच्या एका मित्राने २०२१ मध्ये भाटीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तर, या वर्षी बजाजने व्यावसायिकाला भाटीविरोधात तक्रार न करण्याची धमकी दिली होती. वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात ४ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक न्यायालयात हजर होणार होता. त्यावेळी त्यांना भाटीचा फोन आला. भाटीने त्याच्याविरोधात तक्रार आणि साक्ष दाखल न करण्याची धमकी दिली.
भाटी तुरुंगात असल्याचे व्यावसायिकाला माहित होते. त्यामुळे त्याने तत्काळ कॉल रेकॉर्ड त्याच्या मित्राला ऐकवला. याचप्रकरणी त्यानी खार पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे, भाटीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १९५ अ, ५०६-२, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.