चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मेयप्पन आपल्या निवासस्थानी नसल्याने मुंबई पोलिसांनी गुरुवारी त्यांच्यावर समन्स बजावले. मेयप्पन यांनी शुक्रवारपर्यंत पोलिस चौकशीसाठी मुंबईला गुन्हे शाखेमध्ये हजर व्हावे, असे समन्समध्ये म्हटले आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मेयप्पन यांचा काही सहभाग होता का, याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी चेन्नईला गेले होते. 
चेन्नईतील मेयप्पन यांच्या निवासस्थानी गेल्यावर ते तिथे नसल्याचे घरातील कर्मचाऱयांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर समन्स बजावले. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तो गुरुनाथ मेयप्पन यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. विंदू आणि गुरुनाथ हे दोघेही सातत्याने मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. विंदूनेही आपण मेयप्पन यांच्या संपर्कात असल्याची कबुली पोलिसांकडे दिलीये. त्यानंतर मेयप्पन यांच्या चौकशीसाठी पोलिस चेन्नईमध्ये पोहोचले.
चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे मेयप्पन हे जावई आहेत. विंदूची मेयप्पन यांच्याशी एका पार्टीमध्ये ओळख झाली. त्यानंतर ते दोघे कायम एकमेकांच्या संपर्कात राहू लागले.

Story img Loader