भोपाळच्या खासदार तथा भापजाच्या नेत्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत. न्यायालयीन सुनावणीदरम्यान वेळोवेळी अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना हे वॉरंट जारी केले आहे.
न्यायालयात हजर राहण्याचा दिला होता आदेश
प्रज्ञासिंह ठाकूर तसेच मालेगाव बॉम्बहल्ल्यातील अन्य आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी हजर राहण्याचा आदेश दिला होता. प्रज्ञासिंह ठाकूर सोमवारी न्यायालयात हजर राहिल्या नव्हत्या. त्याऐवजी ठाकूर यांच्या वकिलाने प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत सूट देण्याची मागणी केली होती.
एनआयएला २० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश
विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजेरी लावून कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून हे वॉरंट रद्द करू शकतात. न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएला येत्या २० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काय आहे?
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २०२८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास १०० जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटप्रकरणी एकूण ७ जणांविरोधात खटला चालू आहे. यामध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. सध्या या आरोपींच्या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.