देशभरात इस्लामिक स्टेट म्हणजेच आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई सुरु असून रविवारी उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अबू जाहिद असे या संशयित दहशतवाद्याचे नाव असून तो सौदी अरेबियातून भारतात परतताच त्याला पोलिसांनी अटक केली.

अबू जाहिद सलाउद्दीन शेख हा तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली होती. अबू जाहिद रविवारी सकाळी सौदी अरेबियातून भारतात परतला. एटीएसच्या पथकाने त्याला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरच अटक केली. अबू जाहिदला अटक करुन पोलिसांचे पथक लखनौला रवाना झाले आहे. अबू हा आझमगडचा रहिवासी असल्याचे समजते.

अबू जाहिद हा बिजनौर आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. आयसिसला आर्थिक रसद पुरवण्याचे काम त्याच्याकडे होते. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने या बाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. अबू जाहिद आणि यापूर्वी उत्तर प्रदेशमधून अटक झालेल्या अन्य संशयित दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दुबईतून तो आयसिससाठी काम करत असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी केरळ आणि सुरतमधूनही आयसिसच्या संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. सुरतमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांनी निवडणुकीच्या काळात गुजरातमध्ये घातपात घडवण्याचा कट रचला होता, अशी माहिती समोर आली होती. तर केरळमधून अटक केलेले तरुण तुर्कस्तानमार्गे सीरियात गेले होते. सीरियात आयसिसकडून त्यांना प्रशिक्षण मिळाले होते. त्यानंतर हे तरुण पुन्हा भारतात परतले होते.