हैदराबादमध्ये भाजपाचे निलंबित आमदार राजा सिंह यांना पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अटक केली. राजा सिंह यांनी प्रेषक मोहम्मद यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हैदराबादमध्ये मोठ्या निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी राजा सिंह यांना अटक केली. मात्र, त्यांना त्याच दिवशी जामीनही मंजूर करण्यात आला. याविरोधात पुन्हा एकदा आंदोलने करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली.
हे प्रकरण नेमकं काय आहे?
२० ऑगस्ट रोजी हैदाराबादमध्ये होणाऱ्या मुनव्वर फारुखी यांच्या कार्यक्रमाला भाजपा आमदार राजा सिंह यांनी विरोध केला. मुनव्वर फारुखी हे हिंदू देवतांवर विनोद करून धार्मिक भावना दुखावतात, असा आरोप करत कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी धमकी राजा सिंह यांनी दिली होती.
या कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी राजा सिंह यांनी फारुखी यांचा कार्यक्रम जेथे होणार होता, त्याठिकाणी स्टेज जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी राजा यांना ताब्यात घेतले. राजा सिंह यांना त्यांच्या २० कार्यकर्त्यांसह नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र, फारुखी यांचा शो झाल्यानंतर पोलिसांनी राजा यांना सोडून दिले. त्यानंतर राजा सिंह यांनी युटूबवर एक व्हिडीओ पोस्ट करत, प्रेषक मोहम्मद यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच या व्हिडीओच्या शेवटी त्यांनी मी सुद्धा विनोद करत होतो, असा खोचक टोला लगावला.
दरम्यान, राजा सिंह यांच्या व्हिडीओनंतर हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली. अनेकांनी पोलीस आयुक्तालयसमोर आंदोलनं करत, राजा सिंह यांना अटक करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी राजा सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत, त्यांना अटक केली. मात्र, त्याच दिवशी त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला.
जामीन मिळाल्यानंतर राजा सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषाचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पुन्हा राजा सिंह यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. या आंदोनलांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजा सिंह यांना पुन्हा अटक केली. कायदा व सुव्यवस्था राखावी, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली.
हेही वाचा – आणखी प्रार्थनास्थळे बांधली तर लोकांना रहायला जागा उरणार नाही; केरळ हायकोर्टाने नाकारली मशिदीला परवानगी
फारुखींचा बंगळूरूनंतर दिल्लीतील कार्यक्रमही नाकारली
दिल्ली पोलिसांनी मुनव्वर फारुकी यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. २८ ऑगस्ट रोजी दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार होता. धार्मिक समोखा बिघडण्याचे कारण देत, पोलिसांनी ही परवानगी नाकारली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बंगळूरूतील कार्यक्रमही ऐनवेळवर रद्द करण्यात आला होता. त्यानंतर हा कार्यक्रम हैदराबामध्ये आयोजित करण्यात आला होता.