उत्तर प्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत नेहमीच वेगवेगळे दावे करण्यात येतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. खूनासारख्या गंभीर प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपींनं चक्क कारागृहातून लाईव्ह स्ट्रिमिंग केलं आहे. “तुरुंगात स्वर्गसुख अनुभवत असून माझं सर्व मजेत सुरू आहे”, असा दावाही या आरोपीने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी सध्या उत्तर प्रदेशच्या बरेली मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलीस उप महासंचालक (कारागृह) कुंतल किशोर म्हणाले की, आम्ही हा व्हिडिओ पाहिला असून सदर प्रकरण गंभीर आहे.

दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आसिफ नावाचा आरोपी तुरुंगात बसल्याचे दिसून येत आहे. मी तुरुंगातून लाईव्ह आहे, असे सांगताना तो लवकरच बाहेर येणार असल्याचेही जाहीर करून टाकतो. “मी सध्या स्वर्गात असून इथं चैनीत राहतोय. लवकरच मी आता बाहेर येणार आहे”, असं बोलताना तो दिसत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदार राकेश यादव (३४) यांचा दिवसा-ढवळ्या गोळी गाळून खून केल्याबद्दल आसिफ शिक्षा भोगत आहे. २ डिसेंबर २०१९ रोजी दिल्लीच्या शहाजहाँपूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसिफने गोळीबार केला होता. या गुन्ह्यात राहुल चौधरी नावाचा एक सहआरोपी असून तोही आसिफ यांच्याबरोबर बरेलीच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

आसिफचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राकेश यादवच्या भावाने जिल्हा न्यायदंडाधिकारी उमेश प्रताप सिंह यांची गुरुवारी भेट घेऊन याबद्दल चिंता व्यक्त केली.

कायद्यानुसार आरोपींना तुरुंगात मोबाइल वापरता येत नाही. मात्र या प्रकरणात आरोपीकडे मोबाइल कसा पोहोचला? त्याने इतक्या बिनदिक्कत लाईव्ह स्ट्रिमिंग कसे केले? असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.