२८ वर्षीय एअर होस्टेस अर्चना धीमानचा मृत्यू झाला आहे. बॉयफ्रेंडच्या घरीच तिचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूचं कोडं आता उलगडलं आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर आदिशसोबत अर्चनाची ओळख काही दिवसांपूर्वी एका डेटिंग अॅपवर झाली होती. आधी ओळख झाली मग प्रेम जमलं मग ब्रेक अपही झालं. या बातमीला अनेक कंगोरे आहेत. चौथ्या मजल्यावरून खाली पडून एअर होस्टेसच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसांना खुनाचं प्रकरण वाटतं आहे. कारण अर्चनाच्या आईनेच तिच्या बॉयफ्रेंडने तिला ढकललं असावं असा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांनी या एअरहोस्टेसच्या मृत्यूबाबत काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधल्या बंगळुरूमध्ये अर्चना धीमानचा मृत्यू झाला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला. हे घर तिच्या बॉयफ्रेंडचं आहे. कारण मृत्यू झाला तेव्हा अर्चना तिचा बॉयफ्रेंड आदिशच्याच घरी होती. सुरूवातीला पोलिसांना हे आत्महत्येचं प्रकरण वाटलं होतं. पण आता अर्चनाच्या आईने हा आरोप केला आहे की आदिशनेच तिला धक्का दिला असावा त्यामुळे आता पोलीस त्याच अनुषंगाने तपास करत आहेत आणि त्यांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हाही दाखल केला आहे.
कोण आहे अर्चना धीमान?
अर्चना धीमान ही हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला येथे राहणारी होती. तर आदिश हा केरळचा आहे. या दोघांची ओळख एका डेटिंग अॅपवर झाली. सुरूवातीला आदिशने पोलिसांना हे सांगितलं की माझ्यामध्ये आणि अर्चनामध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर अर्चनाचा इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला. मात्र आता या प्रकरणी तिची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आहे.
अर्चना ही बंगळुरूमध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करत होती. त्यानंतर ती इंटरनॅशनल कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करू लागली. आदिश आणि तिची ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित जाले. त्यानंतर या दोघांमध्ये वाद होऊ लागले, खटके उडू लागले. दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अर्चनाला आदिशला एकदा भेटून सगळा सोक्षमोक्ष लावायचा होता त्यामुळेच ती आदिशच्या फ्लॅटवर आली होती. यावेळीच तिचा मृत्यू झाला. साऊथ ईस्ट झोनचे डीसीपी सी.के. बाबा यांनी ही माहिती दिली. तसंच अर्चना ज्या ठिकाणाहून पडली असं सांगितलं गेलं तिथून उडी मारणं इतकं सहज शक्य नाही. या प्रकरणी पोलिसांनी आदिशला ताब्यात घेतलं आहे. आदिशने हे मान्य केलं आहे की आमचे प्रेमसंबंध होते आणि दोघांमध्ये भांडण झालं होतं. आता या प्रकरणी अर्चनाच्या आईने आदिशवर आरोप केला आहे की त्यानेच माझ्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली ढकललं आणि त्यामुळेच तिचा हा मृत्यू म्हणजे आत्महत्या नाही तर हत्या आहे.
आदिश आणि अर्चनाने एक दिवस आधी पाहिला होता सिनेमा
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चनाचा मृत्यू झाला त्याच्या आदल्यादिवशी अर्चना आणि आदिश हे दोघंही सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघांनीही सोबत जेवण केलं आणि रात्री घरी परतले होते. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी अर्चनाचा मृत्यू झाला तेव्हा दोघांनीही मद्यपान केलं होतं. आदिशचं म्हणणं हे आहे की अर्चना अपघाने खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अर्चना खाली कोसळल्यानंतर आदिशने तातडीने पोलिसांना कळवलं होतं. पोलीस घटनास्थळी आले त्यांनी अर्चनाला रूग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी हे देखील सांगितलं आहे की अर्चनाच्या आई वडिलांना आदिशसोबत अर्चनाचे प्रेमसंबंध आहेत याची माहिती होती. तसंच या दोघांमध्ये हल्ली वाद आणि भांडणं वाढली होती अशी माहिती या दोघांना होती. अर्चनाचा मृत्यू झाल्यानंतर आदिशनेच तिला धक्का दिला असा आरोप अर्चनाच्या आईने केला आहे. त्यामुळे या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.