तिरुवनंतपुरम : उपचार सुरू असताना एका रुग्णाने २३ वर्षीय वंदना दास या डॉक्टरवर हल्ला करून त्यांची हत्या केली. कोल्लम जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत अनेक ठिकाणी आंदोलने केली. त्यानंतर केरळ सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्याची गुरुवारी तयारी दर्शवली. तसेच तातडीने एक बैठक आयोजित केली.
रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी सरकारने नवीन कायदा तातडीने लागू करावा, या मागणीसाठी बहुसंख्य डॉक्टरांनी गेल्या २४ तासांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सकाळी त्यांच्या कार्यालयात विविध डॉक्टरांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’सह अनेक संघटनांनी आंदोलन सुरू केल्यानंतर बहुसंख्य डॉक्टर गेल्या २४ तासांपासून संपावर गेले आहेत. याव्यतिरिक्त ‘केरळ गव्हर्मेट मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन’ने गुरुवारी संपाची हाक दिली.
हे यंत्रणेचे अपयश : केरळ उच्च न्यायालय
कोची : कोल्लम जिल्ह्यातील एका तालुका रुग्णालयात बुधवारी २३ वर्षीय डॉक्टरची रुग्णाने केलेली हत्या ही ‘यंत्रणेचे अपयश’ आहे, असे केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. न्यायमूर्ती देवेन रामचंद्रन आणि कौरस ई. यांच्या खंडपीठाने राज्याच्या पोलीस प्रमुखांना निर्देश देताना सांगितले की, हल्ल्याच्या अशा आणखी घटना टाळण्यासाठी कायदेशीरदृष्टय़ा शक्य असेल त्या पद्धतीने सर्व रुग्णालयांतील डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवावी. अन्य डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यावर आता हल्ला झाला तर, राज्याच्या पोलीस महासंचालकांना जबाबदार धरण्यात येईल.