Murder of Rretired Karnataka DGP Om Prakash : कर्नाटकचे निवृत्त डीजीपी ओम प्रकाश यांची त्यांच्याच पत्नीने हत्या केली आहे. याप्रकरणी त्या सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. ओम प्रकाश यांची हत्या करण्यापूर्वी ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी यांनी काही अधिकारी आणि पत्रकारांना मेसेज पाठवले होते. हे मेसेज आता इंडियन एक्स्प्रेस आणि इंडिया टुडेच्या हाती लागले आहेत. या मेसेजनुसार त्या देखरेखीखाली असून त्यांच्या आणि मुलीच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.
ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी यांनी पत्रकारांच्या ग्रुपवर काही मेसेज पाठवले होते. हे मेसेज इंडिया टुडेच्या हाती लागले असून त्यांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. “माझ्यार पाळत ठेवली जात आहे. मी जिथे जाते तिथे नेहमीच ओमप्रकाशच्या एजंट्सच्या देखरेखीखाली असते”, असं पल्लवी यांनी एका संदेशात लिहिल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. तसंच, त्यांच्यावर सातत्याने विषबाधा केला असल्याचा दावाही या संदेशांमधून केला जातोय. “मी त्यांना वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास सांगत आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी जिथे जिथे स्वतः जाते तिथे तिथेच अन्न आणि पाण्यातून विषबाधा सुरू होते”, असं त्यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं.
एवढंच नव्हे तर स्विगी आणि झोमॅटोमधून मागवलेल्या अन्नांमधूनही भेसळ झाल्याचा दावा त्यांनी केलाय. घरातील अन्नातून विषबाधा होण्याकरता घरातील मदतनीसाला लाच दिल्याचा आरोप त्यांनी केला. “विषबाधा हा फक्त एक शब्द आहे जो तुम्हाला कळला पाहिजे. पण तो खूप वेदनादायक आहे. माझ्या मुलीला आता खूप त्रास होतोय. मी शांत बसू शकत नाही”, असंही पल्लवी यांनी मेसेजमध्ये म्हटलं होतं.
भेसळ आणि विषयुक्त पदार्थ खाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. “वर्षानुवर्षे विषबाधेमुळे मूत्रपिंडांनाही नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत वैद्यकीय अहवाल पाहिजे. सध्या मी तूप आणि निंबू (लिंबू) सारख्या गोष्टींनी घरीच डिटॉक्स करत आहे.” याची सत्यता तपासण्यासाठी घरातील मदतनीसाची चौकशी करावी, असाही सल्ला त्यांनी दिला. एवढंच नव्हे तर एका मेसेजमध्ये त्यांनी त्यांच्यावर ओढावलेली आपबितीही कथन केलीय. त्या म्हणाल्या “काल रस्त्यावरून चालत असताना, व्हॅनचा दरवाजा उघडा ठेवून एकाने माझ्यावर कसलीतरी पावडर फेकली. माझ्या संपूर्ण शरीरातून जळजळ निर्माण झाली तेव्हा माझ्या हे लक्षात आलं.”
ओम प्रकाश पीएफआयचा सदस्य
“ओम प्रकाश हे पीएफआयचा सदस्य असून त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. मी काय करू? माझ्या मुलीला प्रचंड त्रास होत आहे”, असंही त्यांनी मेसेजमध्ये म्हटलं होतं. “जर माझ्या मुलीला आणि मला काही झाले, ते कितीही नैसर्गिक किंवा अपघाती वाटले तरी, त्यासाठी माझा नवरा जबाबदार असेल”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
ओम प्रकाश यांच्याकडे शस्त्रे आणि पैसे कुठून येतात?
दुसऱ्या मेसेजमध्ये त्यांनी थेट राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांकडूनच मदत मागितली होती. त्या मेसेजमध्ये म्हणाल्या की, “किमान अजित डोभाल यांच्या लक्षात तरी आणा. ओम प्रकाश यांना ही शस्त्रे आणि पैसे कुठून मिळत आहेत? हे रान्या राव प्रकरणापेक्षाही धोकादायक आहे”, असा दावा केल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. पल्लवी पुढे म्हणाल्या, “सत्ता भ्रष्ट करते आणि जर पैशाची ताकद सोबत असेल तर निरंकुश सत्ता अधिक भ्रष्ट करते. पैसा सर्वकाही खूप सोपे करतो.”
पतीच्या कार्यकाळात अनेकांनी आत्महत्या केल्या
त्यांनी ओम प्रकाश यांच्या ताब्यात असलेले रिव्हॉल्व्हर जप्त करण्याची आणि “कोणतेही हॅकिंग होण्यापूर्वी किंवा ते गायब होण्यापूर्वी” हे मेसेज जतन करण्याची विनंती केल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. पतीच्या सेवेतील शेवटच्या महिन्यांचा उल्लेख करताना पल्लवी म्हणाल्या, “माझ्या पतीच्या डीजीपीच्या शेवटच्या काही महिन्यांत, जवळजवळ दर दहा ते पंधरा दिवसांनी एक पोलिस अधिकारी आत्महत्या करत असे. प्रत्येक केस मानसिक अस्थिरतेचा खटला म्हणून घोषित केला जाऊ शकतो.”
मालमत्तेच्या हव्यासापोटी कौटुंबिक छळ
तर, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “मी आणि माझी मुलगी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलो आहोत. त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पारंपरिक नसून अत्यंत आधुनिक आहेत”, असे मेसेज त्यांनी पाठवले होते. तसंच, “माझ्या मुलाकडे रिव्हॉल्व्हर आणि रायफल आहेत ज्या ताबडतोब जप्त कराव्यात किंवा काढून घ्याव्यात. या सर्व घटना मालमत्तेच्या हव्यासापोटी आहेत. माझा नवरा माझ्या मुलाला आणि सुनेला पाठिंबा देत आहे”, असंही एका मेसेजमध्ये म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद आहे.
या व्हॉट्सअॅप मेसेजची आता चौकशी सुरू करण्यात आली असून या घटनांची साखळी आणि हत्येमागील संभाव्य हेतू एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही इंडिया टुडेने वृत्तात म्हटलं आहे.