अमेरिकन नागरिक आणि खलिस्तानी कट्टरवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखील गुप्ता याला चेक प्रजासत्ताकच्या तपास यंत्रणेने ताब्यात घेतलेले आहे. अमेरिकेने गुप्ता यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई झाली होती. परराष्ट्र मंत्रालयाने यांबंधी आता भाष्य केले असून निखील गुप्ता यांना तीन वेळा भारतीय राजदूताशी संपर्क साधू देण्याची (कॉन्सुलर अ‍ॅक्सेस) मुभा देण्यात आली होती, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. ३० जून रोजी निखील गुप्ता यांना चेक प्रजासत्ताकमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरिंदम बागची म्हणाले, “एक भारतीय नागरिक सध्या चेक प्रजासत्ताकच्या कारावासात आहे. त्यांना अमेरिकेच्या ताब्यात देण्याची याचिका प्रलंबित आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना तीन वेळा कॉन्सुलर अ‍ॅक्सेस दिला गेला आहे. आवश्यकतेनुसार यापुढेही त्यांना कॉन्सुलर सहकार्य दिले जाईल. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे यावर अधिक भाष्य करता येणार नाही.”

हे वाचा >> ‘गोमांस, डुकाराचे मांस खाण्यास भाग पाडले’ पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेतील गुप्ताचा आरोप

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींनी पन्नूच्या हत्येचा कट हा द्वीपक्षीय संबंधावर परिणाम टाकू शकतो, असे वक्तव्य केले होते. यावर भाष्य करताना अरिंदम बागची म्हणाले की, अमेरिकेने दिलेल्या सूचना आम्ही गांभीर्याने घेतल्या आहेत. तसेच या प्रकरणाशी निगडित सर्व पैलूंचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र या समितीची मुदत किती किंवा त्यांनी कोणते निष्कर्ष काढले, याबाबत सध्या माझ्याकडे माहिती नाही.

कॉन्सुलर अ‍ॅक्सेस म्हणजे काय?

एखाद्या देशाचा व्यक्ती दुसऱ्या देशातील तुरुंगात गेला तर त्याला त्याच्या मूळ देशाकडून कॉन्सुलर अ‍ॅक्सेस दिला जातो. या माध्यमातून राजनैतिक अधिकारी सदर व्यक्तीची तुरुंगात जाऊन भेट घेतात.

आणखी वाचा >> “खलिस्तानी दहशतवादी पन्नूला करायचे आहेत भारताचे तुकडे आणि…”, NIA च्या सूत्रांनी दिली ‘ही’ माहिती

परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेने दिलेल्या सूचनांचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. मात्र या समितीची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. बागची यांनी कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करून त्यावर भाष्य करण्यास नकार दिला होता, तसेच गुप्ता यांचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य नसल्याचे म्हटले.

अमेरिकेच्या न्याय विभागाने मॅनहॅटन येथील फेडरल न्यायालयात आरोपपत्र दाखल करून भारतीय नागरिक निखील गुप्ता ऊर्फ निक याने हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. एका व्यक्तीला पन्नूची हत्या करण्याचे काम देण्यात आले होते, अशी माहिती यूकेमधील दैनिक फायनान्शियल टाइम्सने दिली होती.

हे वाचा >> अफजल गुरूचा फोटो वापरून गुरुपतवंतसिंग पन्नूने दिली भारताला धमकी; म्हणाला, “संसदेच्या…”

कोण आहे निखिल गुप्ता?

अमेरिकेच्या न्याय विभागाने छापलेल्या पत्रकाप्रमाणे निखिल गुप्ता हा ५२ वर्षीय भारतीय नागरिक आहे. निखिल गुप्ताला ३० जून २०२३ रोजी अटक करण्यात आली. निखिल गुप्ताने एका कथित भारतीय सरकारी कर्मचाऱ्याची चर्चा केली होती. त्या भारतीय अधिकाऱ्याची नोंद कुठेच नाही त्याला CC-1 म्हणून संबोधलं जातं. गुप्ताच्या परिवारातर्फे काही दिवसांपूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भारताने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकेतून केली आहे. तसेच याचिकेद्वारे कुटुंबियांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. निखिल गुप्ता हा दिल्ली येथील व्यावसायिक असून त्याला चुकीच्या मार्गाने अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांच्याशी कुटुंबियांचा संपर्क होऊ दिला जात नाही. गुप्ता यांच्या मुलभूत अधिकाचे उल्लंघन झाले असल्याचे कुटुंबियांनी याचिकेत म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder plot against pannun india got consular access to nikhil gupta on three occasions says eam spokesperson arindam bagchi kvg