बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेला आणि सध्या तुरुंगाची हवा खात असलेला राम रहीम हत्या प्रकरणातही दोषी सिद्ध झालाय. शुक्रवारी (८ ऑक्टोबर) हरियाणातील विशेषी सीबीआय न्यायालयाने मॅनेजर रंजीत सिंह हत्ये प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमसह ४ आरोपींना दोषी घोषित केलं. गुरमीत राम रहीम सध्या बलात्कार प्रकरणी रोहतकच्या तुरुंगात आहे. गुरमीत राम रहीमला दोषी घोषित केल्यानंतर पीडित रंजीत सिंहच्या मुलानं पहिली प्रतिक्रिया दिली. आम्हाला डेराची दहशत वाटते, मात्र, आता सुखाने झोपू शकेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.
“मी ८ वर्षांचा असताना वडिलांना गोळ्या झाडून मारलं”
हत्या झालेल्या रंजीत सिंह यांचा मुलगा जगसीर सिंहने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं, “मी जेव्हा केवळ ८ वर्षांचा होतो, तेव्हा १० जुलै २००२ रोजी सायंकाळी खानपूर कोलियानमधील शेतात ४ हल्लेखोरांनी वडील रंजीत सिंह यांच्यावर गोळ्या झाडल्या. मी तेव्हा लहान होतो.”
“वडिलांच्या हत्याऱ्याला शिक्षा झाली, आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल”
“मला आठवतंय की मी वडिलांसोबत गाडीवर शेतात जायचो. त्या दिवशी घरात वीज नव्हती. मी वडिलांना वारंवार मला शेतात घेऊन चला म्हणत होतो. आम्ही जाणार होतो तेवढ्यात वीज आली आणि शिकवणीचे शिक्षक आल्यानं मला घरीच राहावं लागलं. त्यानंतर मी त्यांना मोटरसायकलवरुन जाताना पाहिलं, पण ते पुन्हा परत आलेच नाही. मात्र, आज त्यांच्या हत्याऱ्याला शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, असा मला विश्वास आहे,” असं जगसीरने नमूद केलं.
“दोषींना शिक्षा व्हावी यासाठी माझं कुटुंब १९ वर्षे लढा देत होतं “
१९ वर्षे सुरू असलेली या कायदेशीर लढाईविषयी जगसीर सिंह म्हणाले, “डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह आणि त्याचे ४ सहकारी जसबीर सिंह, सबदिल सिंह, कृष्ण लाल, इंदर सेन यांना वडिलांच्या हत्ये प्रकरणी शिक्षा व्हावी यासाठी माझं कुटुंब इतके वर्षे लढाई देत होतं. हे सर्व माझे आजोबा जोगिंदर सिंह यांच्यामुळे होऊ शकलं. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कायदेशीर लढाई पुढे नेली. दुर्दैवाने माझ्या आजोबांचंही जुलै २०१६ मध्ये निधन झालं. माझ्या दोनही मोठ्या बहिणींची लग्नं झालीत. त्यांच्या पतींनी देखील या कायदेशीर लढाईत मदतकेली. आज १९ वर्षांनी माझं कुटुंब सुखाने झोपेल.”
“कायदेशीर लढाई लढायला किती पैसे लागलेत हेही मला माहिती नाही “
लहानपणीच वडिलांची हत्या झालेल्या जगसीरचं आता लग्न झालंय. त्यांना दोन मुलं आहेत. उपजीविकेसाठी ते शेतीच करतात. “मी माझे वडिलांच्या शेतीवरच कुटुंबातं भरणपोषण करतो. मी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. माझं संपूर्ण कुटुंब आताही खानपूर कोलियानमध्ये राहतं. ही अनेक वर्षे सुरू असलेली कायदेशीर लढाई लढायला किती पैसे लागलेत हेही मला माहिती नाही. मात्र, आता पैसा महत्त्वाचा नाही, आम्हाला न्याय मिळाला याचा आनंद आहे,” असंही जगसीरनं नमूद केलं.