गुरूमीत राम रहिमला बलात्कार आणि हत्येच्या आरोपांमध्ये अटक झाली आहे. मात्र हरियाणा सरकार गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर मेहरबान झाल्याचं चित्र आहे. हरियाणा सरकारला या बलात्कारी आणि हत्या करणाऱ्या राम रहिमबाबत इतकं प्रेम का वाटतं आहे हे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. असं म्हणतात की कायद्याच्या नजरेत सगळे समान असतात. मात्र हरियाणा सरकारने बाबा रहिमवर कृपा दृष्टी ठेवली आहे. त्यामुळेच या बाबा राम रहिमला १४ महिन्यांत १३३ दिवसांची पॅरोल मंजूर झाली आहे.
गुरूमीत राम रहिमला कोणत्या आरोपांमध्ये शिक्षा ?
२८ ऑगस्ट २०१७ ला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरूमीत राम रहिमला दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर १७ जानेवारी २०१९ ला पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१४ महिन्यांमध्ये हरियाणा सरकारची पॅरोल कृपा
हरियाण सरकारने गुरुमीत राम रहिमला गुरुग्रामच्या रूग्णालयात असलेल्या आजारी आईला भेटण्यासाठी १ महिन्याची पॅरोल २४ ऑक्टोबर २०२० ला मंजूर केली. त्यानंतर २१ मे २०२१ लाही पु्न्हा एकदा आजारी आईला भेटण्यासाठी एक महिन्याची पॅरोल मंजूर केली.
१८ ऑक्टोबर २०२१ ला न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर रंजीत सिंह याच्या हत्येच्या गुन्ह्यात राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ७ फेब्रुवारी २०२२ ला हरियाणा सरकारने या बलात्कारी बाबाची २१ दिवसांची पॅरोल मंजूर केली. जून २०२२ मध्ये या राम रहिमला पुन्हा एकदा एक महिन्याचा पॅरोल मंजूर करण्यात आला. ऑक्टोबर २०२२ मध्ये राम रहिमला ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. त्यानंतर याच महिन्यात म्हणजेच २१ जानेवारी २०२३ ला बाबा राम रहिमला आणखी ४० दिवसांचा पॅरोल मंजूर कऱण्यात आला. डेरा प्रमुख शाह सतनाम यांच्या जयंतीसाठी हा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
१३३ दिवस बाबा राम रहिम पॅरोलवर
मागच्या १४ महिन्यांचा हिशोब केला तर १४ महिन्यातले १३३ दिवस बाबा राम रहीम तुरुंगाबाहेर होता. कारण हरियाणा सरकारने त्याला पॅरोल मंजूर केली. राम रहिमने दोन बलात्कार आणि दोन हत्या केल्या आहेत. त्याला २० वर्षांची शिक्षा आणि दुहेरी जन्मठेप अशा शिक्षाही सुनावण्यात आल्या आहेत तरीही १४ महिन्यातले १३३ दिवस बाबा राम रहिम हा पॅरोलवर बाहेर असल्याचं समोर आलं आहे.
राम रहिमला पॅरोल कशासाठी?
राम रहिमला गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. अशात त्याला वारंवार विविध क्षुल्लक कारणांसाठी पॅरोल का दिला जातो आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. रोहतक न्यायालयाने शनिवारी पॅरोल मंजूर केला. पॅरोल मंजूर होताच, तो थेट बागपत येथील त्याचा आश्रमात पोहोचला. यावेळी त्याने तलवारीने केक कापून पॅरोल मिळाल्याचा आनंद साजरा केला. यावेळी त्याचे भक्तदेखील उपस्थित होते. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.