जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून किमान १० पर्यटक जखमी झाले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांना बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत पुण्यातली दोन कुटुंबंही सापडली. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला हल्ल्याचा निषेध
गोळीबार झाल्यानंतर अनेक जखमी पर्यटक अनेक ठिकाणी जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून येत आहेत. कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथील अनेक पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितलं जातं आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. हल्ला करणारे दहशतवादी हे रानटी आहेत. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे, असेही ते म्हणाले. जखमींना उपचार देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
हल्ला झालेल्या कुटुंबातील लोकांशी आम्ही संपर्कात आहोत. दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. गृहमंत्री अमित शाह यांनीही त्या ठिकाणी भेट दिली. जगदाळे आणि गणबोटे अशी पुण्याची दोन कुटुंबंही त्या हल्ल्यात सापडली. तीन महिला सुरक्षित आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आम्ही पुण्यातील नागरिकांच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातल्या इतर लोकांशीही आम्ही संपर्कात आहोत. लवकरात लवकर आम्ही त्यांना हवाई मार्गाने किंवा रेल्वे मार्गाने घेऊन येऊ असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. हा हल्ला देशावरचा हल्ला आहे. एकाही दहशतवाद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडणार नाहीत. लवकरच इतर अपडेट्स समोर येतील असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
नावं विचारुन झाडल्या गोळ्या
दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर अनेकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या, असा दावा प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पर्यटक आणि त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक सैरावैरा पळताना दिसत आहेत. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सगळ्या देशातील नेत्यांनीच निषेध केला आहे.