खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्री करण्यात आलं आहे. आज १८ व्या लोकसभेचा सदस्य म्हणून त्यांनी मराठीत घेतली. या शपथेचा व्हिडीओ मुरलीधर मोहोळ यांनी पोस्ट केला आहे.
काय म्हटलं आहे मुरलधीर मोहोळ यांनी?
खासदारकीची शपथ मायमराठीत…१८ व्या लोकसभेचा सदस्य म्हणून आज मायमराठीत शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहू ! अशी पोस्ट मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी काय शपथ घेतली?
“मी मुरलीधर मोहोळ लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रति अनंत श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. भारतीय संविधानाचे आणि एकतेचे रक्षण करेन. जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडेन” असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली. याची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
नगरसेवक कसा झालो ते मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं होतं
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपण नगरसेवक कसे झालो आणि मंत्री कसा झालो ते सांगितलं होतं. मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुण्यातल्या कोथरुडमध्ये अनेकजण बाहेरून राहायला आले आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदमांचे बंधू हे सातत्याने चारवेळा त्या ठिकाणाहून नगरसेवक होते. त्यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि त्या ठिकाणी माझं नाव समोर आलं. माझ्या गावाकडून आणि परिसरातून लोक राहायला आले होते. पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी मला निवडून दिलं. त्यावेळी मला झालेला आनंद हा आतापेक्षाही मोठा होता. त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींना भेटायला गेलो. त्यावेळी गोपीनाथ मुंडेनी माझं कौतुक केलं होतं. तिथून सुरू झालेला प्रवास आणि नंतर चार वेळा नगरसेवक झालो.”
हे पण वाचा- केंद्रीय मंत्री मोहोळांच्या समोरच भाजपाच्या दोन गटात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं
“गोपीनाथ मुंडे लोकनेते होते, त्यांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांच्यासह एक पिढी घडली.” गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. “आज या सगळ्या आनंदात मला सर्वात जास्त आठवण कुणाची येत असेल, कुणाला मी मिस करत असेन तर ते गोपीनाथ मुंडेंना. मी त्यांच्या खूप जवळचा होतो. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यामुळे राहून-राहून वाटतं की आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आजचा दिवस बघायला ते असायला हवे होते.” हे सांगताना मोहोळ भावूक झाले होते.
केंद्रीय मंत्री होईन असं वाटलंही नव्हतं
“मला केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी मिळेल अशी आशा नव्हती. मला जेव्हा कळलं की मलाही शपथ घ्यायची आहे ते समजल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. शपथविधीच्या आदल्यादिवशी मला राष्ट्रीय अध्यक्षांच्या पीएचा फोन आला आणि मला शपथविधीसाठी तयार राहायला सांगितलं. सुरुवातीला मला काही समजेना. शेतकऱ्याचा मुलगा होतो, घरच्या उसाच्या गाड्यावर काम केलं. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी फक्त भाजपातच मिळू शकते.” असं मुरलीधर मोहोळ म्हणाले होते, आज त्यांनी मराठीत शपथ घेतली ज्याची चर्चा होते आहे.