Murshidabad Waqf Amendment Bill violence : वक्फ सुधारणा विधेयक नुकतंच संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गेल्या काही दिवासंपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील वक्फ सुधारणा विधेयकाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आहे. मात्र, अद्यापही देशातील विविध ठिकाणी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

आता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावरून हिंसाचार उफाळला आहे. आज मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मुर्शिदाबादमधील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करत मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं. यानंतर मुर्शिदाबादमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असल्याची माहिती सांगितली जात आहे.

मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध निदर्शने करण्यासाठी मोठा जमाव जमला एकत्र आला होता. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत तेथील एक महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच यावेळी पोलिसांच्या गाड्या देखील पेटवण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

यामुळे मुर्शिदाबादमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुर्शिदाबादमधील हिंसाचाराच्या या घटनेवरून भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अमित मालवीय यांनी म्हटलं की,”मुर्शिदाबादच्या रस्त्यांवरून उसळणाऱ्या हिंसक इस्लामी जमावाला लगाम घालण्यासाठी पश्चिम बंगाल पोलीस संघर्ष करत आहेत. मात्र,कदाचित ममता बॅनर्जी यांच्या सूचनांनुसार किंवा त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे सध्याच्या परिस्थितीला हातभार लागला असावा”, अशी टीका अमित मालवीय यांनी केली.