एनआय, मुर्शिदाबाद
मुर्शिदाबाद हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी आतापर्यंत दीडशे जणांना अटक केली आहे. दरम्यान, वक्फ सुधारणा कायद्यावरून सुरू झालेल्या हिंसाचारावरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधक भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दंगलग्रस्त भागात पोलिसांच्या मदतीला सीमा सुरक्षा दलाच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. समशेरगंज, धुलियन आणि इतर हिंसाग्रस्त भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल तैनात केले आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाने शनिवारी केंद्रीय पोलीस दल तैनात करण्याचा आदेश दिला होता.

छायाचित्रे, चित्रफिती बनावट-तृणमूल

हिंसाप्रकरणी समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेली छायाचित्रे, चित्रफिती बनावट असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे, तर धार्मिक छळामुळे लोक तेथून पळून जात आहेत, असे भाजपने म्हटले आहे. हिंसाचारात तिघांचा बळी गेला, तर अनेक जखमी झाले, तसेच घरे, दुकाने, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्यात आले.

दंगलग्रस्त भागातून नागरिकांचे पलायन

कोलकाता: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात जातीय हिंसाग्रस्त भागातून शेकडो लोकांनी भागीरथी नदी पार करून माल्दाजवळील भागात आश्रय घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धुलियन भागातून ४०० जणांनी घर सोडल्याचा दावा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. देवनापूर-सोवापूर ग्रामपंचायतीच्या सुलेखा चौधरी यांनी सांगितले की, सुरुवातीला काही लोक बोटीने आले. शुक्रवार दुपारपासून त्यांची संख्या वाढली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत ५०० हून अधिक लोक या ठिकाणी आले होते. त्यात महिलांची संख्या जास्त होती. स्थानिक प्रशासनाने त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली आहे. शाळांमध्ये त्यांना आश्रय दिला आहे.

वक्फ सुधारणा कायद्यासाठी त्यांनी आम्हाला जबाबदार धरले आणि घरे सोडायला भाग पाडले, असेही महिलेने सांगितले. बॉम्ब फेकल्याचाही दावा महिलेने केला. ‘मी, माझा मुलगा, सून, नातू घरातील काही चीजवस्तू घेऊन बाहेर पडलो. तसे केले नसते, तर आम्ही मारले गेलो असतो,’ असे अन्य एका महिलेने सांगितले.

‘सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करा’

कोलकाता: काँग्रेसचे खासदार इशा खान चौधरी यांनी रविवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसकडे केली.

‘वक्फवरून हिंसेला प्रोत्साहन’

लखनौ: वक्फ सुधारणा कायद्यावरून हिंसा भडकविली जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर रविवारी केला.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची १९ ला बैठक

हैदराबाद: वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डची १९ एप्रिल रोजी बैठक घेणार असल्याची माहिती ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी दिली. बोर्डाचे अध्यक्ष खालिद सैफुल्लाह रहमानी यांच्या नेतृत्वाखाली ‘एआयएमआयएम’च्या मुख्यालयात होईल. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील बोर्डाचे सदस्य आणि इतर मुस्लीम संघटना बैठकीत सहभागी होतील.

आसाममध्ये दगडफेक

गुवाहाटी: आसाममधील कचार जिल्ह्यात निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील काहींनी दगड फेकल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तसेच निदर्शकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला.

मुर्शिदाबाद येथील धुलियन भागातून चारशेहून अधिक हिंदूंना भीतीने नदीपार पळून जाण्यास भाग पाडले. एका शाळेत ते आश्रय घेत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अनुनयाच्या धोरणामुळे मूलतत्त्ववाद्यांना अधिक जोर येतो. – सुवेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, भाजप