Murshidabad Waqf Amendment Bill Violence : वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं, त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला मंजूरी दिली. त्यानंतर या विधेयकाचं कायद्यातही रूपांतर झालं. मात्र, अद्यापही वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात विविध ठिकाणी निषेध आंदोलने सुरु आहेत. पश्चिम बंगालमध्ये या विधेयकाच्या विरोधात नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधातील झालेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागल्याने येथे मोठा तणाव निर्माण झाला आहे.
८ एप्रिल रोजी देखील या ठिकाणी काढण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. यानंतर पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याने तणाव निर्माण झाला आहे. आता पश्चिम बंगाल पोलिसांनी मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी तब्बल ११८ जणांना अटक केली आहे. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना चार राउंड गोळीबार करावा लागला होता. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधातील निदर्शनादरम्यान शुक्रवारी मोठा जमाव जमला होता. या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना १५ पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती सांगितली जाते. तसेच शनिवारी सकाळी शमशेरगंजमध्येही पुन्हा हिंसाचार झाला. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, या संपूर्ण भागात आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
पोलीस महासंचालकांनी काय म्हटलं?
मुर्शिदाबादमधील हिंसाचाराबाबत पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, “आम्ही गुंडगिरी सहन करणार नाही. आम्ही त्याचा अतिशय कडकपणे सामना करू. पोलीस कमीत कमी बळाचा वापर करतात. मात्र, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही परिस्थितीला कडकपणे सामोरं जाऊ. सुरुवातीला निदर्शने झाली. पण नंतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आणि त्याला हिंसक वळण लागलं. काल रात्री आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली. सकाळी पुन्हा एकदा दंगल उसळली आणि आम्ही पुन्हा परिस्थिती नियंत्रणात आणली. गुन्हेगारांनी कायदा हातात घेतला तर आम्ही कडक कारवाई करू, तसेच अफवा परवणाऱ्यांवरी कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा राजीव कुमार यांनी दिला.
दरम्यान, “सुती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सुजरमोर क्रॉसिंगवर आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पण त्यानंतर आम्ही लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, यावेळी जमावाने सार्वजनिक मालमत्ता आणि सार्वजनिक बसेसची तोडफोड आणि आग लावण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्हाला गोळीबार करावा लागला. चार राउंड गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तसेच यामध्ये पंधरा पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत”, अशी माहिती डीजी जावेद शमीम यांनी सांगितली.