अमेरिकेकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांबाबत आपल्या राजवटीत गुप्तपणे करार करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे. सीआयए संचालित हेरगिरी विमानांद्वारे हल्ला करण्यासाठी करार करण्यात आल्याचे पाकिस्तानातील निवृत्त अथवा सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने जाहीरपणे प्रथमच मान्य केले आहे. वादग्रस्त ड्रोन हल्ल्यांबाबत अमेरिकेसमवेत कोणताही मोठा करार करण्यात आला नव्हता, तर केवळ अपवादात्मक स्थितीतच ड्रोन हल्ले करण्यास मान्यता देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांच्या पातळीवर ड्रोन हल्ल्यांबाबत चर्चा करण्यात आली आणि आपले लष्कर अथवा विशेष पथकाच्या अनुपस्थितीतच या हल्ल्यांना मान्यता देण्यात आली, असे मुशर्रफ यांनी स्पष्ट केले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, सदर हल्ल्यांना केवळ दोनदा अथवा तीनदाच मान्यता देण्यात आल्याचे, त्यांनी स्पष्ट केले.
काही वेळी तुम्ही कृती करण्यास विलंब लावू शकत नाही. असे चढउतार सुरूच असतात, डोंगरदऱ्यांमध्ये पोहोचणे शक्य नसते, असेही ते म्हणाले.आदिवासी पट्टय़ात अल-कायदाच्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप असलेला नेक मेहमूद हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला, असे मुशर्रफ म्हणाले.
मात्र नेक मेहमूद हा पाकिस्तानी लष्कराने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाल्याचे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी २००४ मध्ये म्हटले होते. ड्रोन हल्ल्यांना मान्यता देण्यात आल्याचे पाकिस्तानच्या नेत्यांकडून सातत्याने खंडन करण्यात येत होते.

Story img Loader