देशद्रोहाचा खटला सुरू असलेले पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक निर्माण करावे, असे निर्देश पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी दिले. मुशर्रफ  यांना उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलाने न्यायालयात केली होती.
रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने मुशर्रफ यांच्या प्रकृतीची तपासणी करावी. त्यांना झालेल्या आजाराची शहानिशा करून त्याचा अहवाल २४ जानेवारी रोजी न्यायालयात सादर करावा, असे न्यायालयाने सांगितले. देशावर हुकूमशाही लादल्याने मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरवण्यात आला असून, त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ‘‘मुशर्रफ यांच्यावर खरोखर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे काय, त्यांचा आजार बरा होण्यास किती दिवस लागतील, त्यांना अमेरिकेत नेण्याची खरोखर गरज आहे काय, याची तपासणी करून अहवाल सादर करावा,’’ असे न्यायालयाने सांगितले.
न्यायालयाने आदेश देऊनही गुरुवारी मुशर्रफ सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मुशर्रफ न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचे त्यांचे वकील अन्वर मन्सूर यांनी न्यायालयास सांगितले. टेक्सासच्या हृदयरोग रुग्णालयातील डॉक्टरांचे पत्र आम्ही दस्तऐवजासोबत न्यायालयात सादर केले आहे. पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मुशर्रफ यांना टेक्सासमध्ये हलविण्याची शिफारस तेथील डॉक्टरांनी केली आहे, असे मन्सूर यांनी न्यायालयास सांगितले.
माजी अध्यक्षांचे अमेरिकास्थित डॉक्टर अर्जुमंद हाश्मी यांनी पाठविलेले पत्र आम्ही सादर केले असून मुशर्रफ यांना उपचारांसाठी तातडीने परदेशात पाठवावे, अशी शिफारस त्यामध्ये करण्यात आली आहे, असेही मन्सूर म्हणाले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे डॉक्टरांनी शिफारस केली आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी घेण्याचे मुक्रर केले आहे. सुरक्षेचा प्रश्न आणि प्रकृतिअस्वास्थ्य या कारणांवरून मुशर्रफ आतापर्यंत एकदाही न्यायालयात हजर राहिलेले नाहीत.

Story img Loader