पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान निवडणूक लवादाने ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुर्शरफ यांनी भरलेले उमेदवारी अर्ज फेटाळले आहेत. निवडणूक लवादाच्या या निर्णयामुळे मुशर्रफ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धक्का बसला आहे.
अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर मुशर्रफ यांनी पाकिस्तान सोडून परदेशात आश्रय घेतला होता. चार वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या महिन्यात ते पाकिस्तानात परतले होते. त्यांना राजकीय तसेच न्यायालयीन पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यातच ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन राजकीय क्षेत्रात स्थिरावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी निवडणुकीत भाग घेण्यासाठी चित्राल, कराची, कसुर आणि इस्लामाबाद येथून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र २००७ साली आणीबाणी लागू करून घटनेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून निवडणूक अधिकाऱ्यांनी मुशर्रफ यांचे उमेदवारी अर्ज फेटाळले होते. केवळ चित्राल मतदारसंघातील उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला होता. मुशर्रफ यांच्या निवडणूक उमेदवारीला त्यांच्या विरोधकांनी आक्षेप घेतला होता. मुशर्रफ यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निवडणूक लवादाकडे दाद मागितली होती. मात्र लवादाने त्यांची याचिका फेटाळली. इस्लामाबाद येथील आपल्या फार्म हाऊसवर सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुशर्रफ यांनी सांगितले की, न्यायालयाने आदेश दिल्यास आपण तुरुंगात जाण्यास तयार आहोत. देशाच्या भल्यासाठीच आपण आणीबाणीचा निर्णय घेतला होता, असा दावा त्यांनी केला.
मुशर्रफ यांचे उमेदवारी अर्ज फेटाळले
पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान निवडणूक लवादाने ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुर्शरफ यांनी भरलेले उमेदवारी अर्ज फेटाळले आहेत.
First published on: 17-04-2013 at 03:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musharraf applications cancelled by election committee