पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ गुरुवारी बॉम्बहल्ल्यातून बचावल्याचे वृत्त आहे. मुशर्रफ यांच्या निवासस्थानानजीकच शक्तिशाली बॉम्ब पेरून ठेवण्यात आला होता. त्यांचा ताफा तेथून गेल्यानंतर सदर बॉम्बचा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रावळपिंडी येथील ‘आर्म्ड फोर्सेस इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिऑलॉजी’ येथून तपासण्या केल्यानंतर मुशर्रफ यांना त्यांच्या फार्म हाऊसवर आणण्यात येत होते. मुशर्रफ आणि त्यांचा ताफा गेल्यानंतर तासाभराने फैझाबाद आणि रावळ दम चौकादरम्यानच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या रस्त्यावर पहाटे तीनच्या सुमारास बॉम्बचा स्फोट झाला.
या स्फोटामुळे मुशर्रफ यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र मुशर्रफ यांना ठार मारण्याच्याच हेतूने हा स्फोट घडवून आणण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
स्फोट झाला ते ठिकाण शहराबाहेर मुशर्रफ यांच्या ‘चाक शहजाद फार्म हाऊस’पासून तीन किलोमीटर लांब आहे. पदपथाजवळ असलेल्या सांडपाण्याच्या पाइपमध्ये हा बॉम्ब पेरून ठेवण्यात आला होता, असा अंदाज आहे.
मुशर्रफ यांच्या जिवाला दहशतवादी गटाकडून मोठा धोका असल्यामुळे त्यांना अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असून ते बाहेर पडतात, त्या वेळी त्यांच्या जाण्या-येण्याचे सर्व मार्ग कसोशीने तपासण्यात येतात.

Story img Loader