पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील कसुर मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी त्या विरोधात निवडणूक लवादाकडे बुधवारी दाद मागितली आहे.
मुशर्रफ यांचे वकील सलमान सफदर यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे की, मुशर्रफ यांनी राष्ट्रपती या पदावरून १० वर्षे देशाची सेवा केली आहे. मात्र असे असतानाही निर्वाचन अधिकाऱ्याने त्यांचे नामांकन पत्र फेटाळल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
मुशर्रफ यांचा खैबर- पख्तुनख्वा प्रांतातील चित्रल मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचेही याचिकेत मांडण्यात आले आहे. निवडणूक लवादाने निर्वाचन अधिकाऱ्याचा निर्णय बाजूला ठेवून येत्या ११ मे रोजी कसुर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुशर्रफ यांनी लवादाकडे केली आहे. मुशर्रफ यांनी चार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी कराची, कसुर आणि इस्लामाबाद मतदारसंघातील त्यांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा