पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या पक्षाने ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुशर्रफ यांना ते जिवंत असेपर्यंत निवडणूक लढविण्यावर पेशावरच्या उच्च न्यायालयाने बंदी घातल्याने बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये २००७मध्ये आणीबाणी जाहीर करणे, माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी आणि बलुचिस्तानातील नेते अकबर बुगती यांना ठार मारल्याच्या आरोपप्रकरणी मुशर्रफ यांना अटक करण्यात आली आहे.
मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लील लीग (एपीएमएल) पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाचे नेते मोहम्मद अमजद यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुशर्रफ यांचा उमेदवारी अर्ज नाकारल्याबद्दल पक्षाने बहिष्काराचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
मुशर्रफ त्यांच्याविरुद्धच्या सर्व खटल्यांना सामोरे जाणार आहेत, कोणत्याही आरोपापासून ते दूर पळणार नाहीत, असे अमजद म्हणाले. एपीएमएल पक्षाने एकूण १७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते त्यांनी अर्ज मागे घेतले आहेत, असेही ते म्हणाले.पेशावरमधील उच्च न्यायालयाने मुशर्रफ तहहयात निवडणूक लढविण्यावर मंगळवारी बंदी घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा