पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या अपहरणाची योजना तालिबानने आखली असल्याचा इशारा पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. मुशर्रफ यांना सध्या त्यांच्याच फार्म हाउसवर नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
मुशर्रफ यांना त्यांच्या फार्म हाउसवरून न्यायालयात नेण्यात येत असताना, बंदी घालण्यात आलेल्या तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेकडून, त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचे एका वृत्त वाहिनीने म्हटले आहे.
मुशर्रफ यांचे अपहरण करण्यासाठी तालिबान अन्य जिहादी गटांशी चर्चा करून योजना आखत आहेत. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न उधळून लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त ठेवावा, असेही या वाहिनीने आपल्या सूत्रांचा हवाला देत सांगितले आहे.
मुशर्रफ गेल्या महिन्यात मायदेशात परतल्यानंतर, तालिबानने त्यांना ठर मारण्यासाठी हाराकिरी पथके तयार केल्याचा दावा केला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या फार्म हाउसजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती याकडे गुप्तचर यंत्रणांनी लक्ष वेधले आहे.
मुशर्रफ यांना गुरुवारी बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी औपचारिकपणे अटक करण्यात आली. भुत्तो यांना पुरेशी सुरक्षा न दिल्याचा ठपका मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आर्थिक आणि लष्करी आघाडय़ांवर पाकिस्तानला वाचविण्यासाठी आपण मायदेशी परतल्याचा दावा मुशर्रफ यांनी केला आहे. तथापि, येत्या ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढण्यास मुशर्रफ यांना बंदी घालण्यात आली आहे. मुशर्रफ यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader