मोबाइलमध्ये मालवेअर कार्यान्वित करण्यासाठी म्युझिक, लायटिंग किंवा व्हायब्रेशन यावर आधारित असलेल्या पद्धती कशा प्रकारे वापरल्या जातात याचा उलगडा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही वैज्ञानिकांनी केला आहे. बर्मिगहॅम येथील अलाबामा विद्यापीठातील संशोधकांनी असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी या संस्थेने आयोजित केलेल्या माहिती, संगणक व संगणक सुरक्षा या विषयावर चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित परिसंवादात संशोधन निबंध सादर केला आहे. संगणक व माहिती विज्ञानातील सहायक प्राध्यापक राजीव हसन यांच्या  मते, जेव्हा आपण मोबाइलवर संगीत चालू करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यात एक सुप्त संदेश असतो; तो आपल्याला कळत नाही त्यामुळे तुमच्या मोबाइलवर मालवेअर हल्ला होतो. याचा अर्थ केवळ इमेल किंवा इंटरनेट वापरानेच असा हल्ला होतो अशातला भाग नाही.
आपण पारंपरिक मार्गाने येणारी माहिती सुरक्षित असण्यावर भर देतो, पण काही खोडसाळ लोक अनपेक्षित मार्ग सायबर हल्ले करण्यासाठी वापरतात.
अलाबामा विद्यापीठातील संशोधकांनी अतिशय गर्दी असलेल्या एका हॉलमध्ये लोकांच्या हातात असलेल्या मोबाईल संचात संगीताच्या वापराने ५५ फूट अंतरावरून मालवेअर टाकून ते कार्यान्वित करून दाखवले. म्युझिक व्हिडिओ, टेलिव्हिजन लायटिंग, संगणकाचा मॉनिटर (पडदा), बल्ब, सबवूफरची व्हायब्रेशन्स यांच्या मदतीनेही त्यांनी मालवेअर टाकून दाखवले. येथील संगणक सुरक्षा संचालक नितेश सक्सेना यांनी सांगितले की, वेगवेगळ्या मार्गानी लघुसंदेश पाठवून मोबाईल किंवा संगणकावर सायबर हल्ले करता येतात.