‘Anti-Terror Message At 5.5 lakh Mosques: जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख मुस्लिम संघटनांनी तीव्र निषेध केला. जमियत उलेमा-ए-हिंदने म्हटले आहे की, या घटनेला धार्मिक दृष्टिकोन देणे चुकीचे आहे, दहशतवाद हा एक कर्करोग आहे जो इस्लामच्या शांतीच्या संदेशाविरुद्ध आहे.

काल (मंगळवारी) दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील एका लोकप्रिय पर्यटन स्थळाला लक्ष्य करून झालेल्या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला, मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकजण पर्यटक होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी म्हणाले, “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. याचा कितीही निषेध केला तरी तो पुरेसा नाही. या दुःखाच्या वेळी आपला देश शहीद कुटुंबांसोबत आहे.”

५.५ लाखांहून अधिक मशिदींमध्ये दहशतवादविरोधी संदेश

दरम्यान, ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांनी सांगितले की, “भारतातील ५.५ लाखांहून अधिक मशिदींमधील इमाम शुक्रवारच्या नमाज दरम्यान दहशतवादविरोधी संदेश देतील आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांसाठी प्रार्थना करतील.”

ते पुढे म्हणाले की, “पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मशिदींमध्ये प्रार्थना केली जाईल. शुक्रवारच्या नमाज दरम्यान, इमाम त्यांच्या खुत्बा (धार्मिक प्रवचन) मध्ये दहशतवादाविरुद्ध कडक संदेश देतील.”

संघटनेच्या अधिकाऱ्यांना आणि इतर धर्मांच्या प्रतिनिधींना भेटल्यानंतर इलियासी म्हणाले की, धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणे हे केवळ इस्लामविरुद्धच नाही तर मानवतेच्याही विरोधात आहे.

जमियत उलेमा-ए-हिंदकडून निषेध

जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले. एका निवेदनात त्यांनी, या हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले.

मदनी म्हणाले की, “निष्पाप लोकांना मारणारे लोक मानव नाहीत तर जनावरे आहेत. इस्लाममध्ये दहशतवादाला जागा नाही. दहशतवाद हा एक कर्करोग आहे जो शांतता प्रस्थापित करण्याच्या इस्लामच्या धोरणाच्या विरोधात आहे. प्रत्येकाने त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.” ो