उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाळेतील शिक्षिकेनेच संबंधित विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं करून इतर मुलांना मारहाण करण्यास सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता आरोपी शिक्षिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
“संबंधित विद्यार्थ्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होती. त्या मुलाच्या काकानेच मला असं करण्यास सांगितलं होतं. मी ‘अपंग’ असल्याने मी इतर विद्यार्थ्यांना मारण्यास सांगितलं”, असं स्पष्टीकरण आरोपी शिक्षिकेनं दिलं आहे. पीडित मुलगा आणि त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षिकेविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
“मी अपंग आहे, म्हणून…”
‘आज तक’ला प्रतिक्रिया देताना आरोपी शिक्षिका तृप्ता त्यागी म्हणाल्या, “संबंधित विद्यार्थ्याने गेल्या महिन्यापासून आपला अभ्यास पूर्ण केला नव्हता. त्यामुळे त्याला शिस्त लावावी लागली. मी अपंग आहे, म्हणून मी इतर काही विद्यार्थ्यांना त्याला चापट मारायला लावली, जेणेकरून तो गृहपाठ पूर्ण करेल. त्याच्या काकानेच मला असं करण्यास सांगितलं होतं”
हेही वाचा- वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक
धार्मिक भेदभाव केल्याच्या आरोपांना उत्तर देताना त्यागी म्हणाल्या, “आम्ही शाळेत हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करत नाही. आमच्या गावात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. आम्ही सर्वजण एकोप्याने राहतो. संबंधित मुलाशी माझं काहीही वैर नाही.”
व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?
आरोपी शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्याला वर्गात सर्वांसमोर उभं केलं. यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन या विद्यार्थ्याला मारण्यास सांगितलं. तसेच मी तर आता जाहीर केलं आहे की, या मुस्लीम मुलांनी त्यांच्या भागात (मुस्लीम वस्तीत) जावं. शिक्षिकेच्या आदेशानंतर वर्गातील एका मुलाने पीडित मुस्लीम मुलगा रडत असतानाही त्याच्या गालावर चापट मारली. यानंतर शिक्षिका त्या मुलाला म्हणाली की, तू असं काय मारतो आहेस, जोरात मार. यानंतर आणखी दोन मुलं उठली आणि त्यांनीही पीडित मुलाला मारहाण केली.
यानंतर शिक्षिका म्हणाली की, याला मारण्याचं आणखी कोण बाकी आहे. आता पाठीवर मारा. तोंडावर मारल्याने त्याचा गाल लाल होत आहे. त्यामुळे तोंडावर मारू नका. सर्वांनी पाठीवर मारा, असा संवाद संबंधित व्हायरल व्हिडीओतून ऐकू येत आहे.