उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षा परिषद बोर्डाने हायस्कूल आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बलिया येथील रहिवासी असलेल्या आदित्य सिंह हायस्कूल परिक्षेत ९२.५० टक्के गुणांसह अव्वल ठरला आहे. तर चंदौलीच्या इरफानने ८२.७१ टक्के गुणांसह इंटर परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर गंगोत्री देवीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तर प्रदेशात यंदा १३,७३८ विद्यार्थ्यांनी १२ वीची (संस्कृत) परिक्षा दिली. तर ५० हजारांहून अधिक विद्यार्थी १० वीच्या (संस्कृत) परिक्षेला बसले होते.
१२ वीच्या परिक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या इरफानला संस्कृत शिक्षक व्हायचं आहे. मेरिट यादीत पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये तो एकमेव मुस्लीम विद्यार्थी आहे. इरफान हा उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे वडिल सलाउद्दीन हे शेतमजूर आहेत. संस्कृत परिक्षेत तो राज्यात पहिला आला आहे. मंडळाकडे संस्कृत भाषा आणि साहित्य हे दोन अनिवार्य विषय आहेत, यासह इतर विषय देखील आहेत.
इरफानचे वडील सलाउद्दीन म्हणाले, “मी एक शेतमजूर आहे. मला दिवसाला ३०० रुपये मजुरी मिळते. महिन्यातले काहीच दिवस काम मिळतं. आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने मला इरफानला खासगी किंवा इतर कोणत्याही शाळेत पाठवणं शक्य नव्हतं. परंतु तो माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे मला त्याला शिकवायचं होतं. मग मला संस्कृत शाळेची माहिती मिळाली. या शाळेत ४०० ते ५०० शुल्क घेतलं जातं.”
हे ही वाचा >> Operation Kaveri : कावेरी मोहीम फत्ते, सुदानमध्ये अडकलेले सर्व भारतीय मायदेशी परतले
सलाउद्दीन म्हणाले, इरफान अभ्यासात उत्तम आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच त्याने संस्कृत भाषेत रस घेतला. त्याने खूप अभ्यास केला. दरम्यान, कोणतीही तक्रार केली नाही. आमचं घर लहान आहे, घरात कोणत्याही सुविधा नाहीत. तरीदेखील त्याने चांगलं यश मिळालं.