Israel – Palestine News in Marathi : इस्रायल आणि हमासविरोधात घमासान युद्ध सुरू असताना त्याचे पडसाद इतर देशांतही उमटत आहेत. अमेरिकेत एका सहा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली असून इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित ही हत्या असल्याचं समोर आलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अमेरिकेतील एका व्यक्तीने ३२ वर्षीय महिला आणि तिच्या सहा वर्षीय मुलावर चाकूने भोसकून वार केले. मुलावर तब्बल २६ वेळा वार करण्यात आले आहेत. या दरम्यान, महिलेने ९११ वर संपर्क साधून मदत मागितली. पोलीस तिथं पोहोचले तेव्हा तिथं दोघेजण रक्ताबंबाळ अवस्थेत पडले होते. दोघांच्या शरीरावर जखमा होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला असून आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे. जोसेफ कझुबा (७१) असं या व्यक्तीचं नाव असून तो पीडितांचा खोलीमालक होता.
शवविच्छेदनादरम्यान मुलाच्या ओटीपोटातून सात इंच ब्लेड असलेला एक सेरेटेड लष्करी पद्धतीचा चाकू काढण्यात आला, असंही निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा >> Israel – Hamas War : अमेरिकेकडून इस्रायलला तंबी, गाझा पट्टीबाबत दिला महत्त्वाचा इशारा
महिलेने रुग्णालयात उपचार सुरू असताना तिच्या नवऱ्याला मेसेज पाठवला होता. मारेकरी त्यांच्या घरी आला. त्याने महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. ‘तुम्हा मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही’, असं म्हणत त्याने वार केला, असा मेसेज तिने पतीला पाठवला होता. या मेसेजचा हवाला देत पोलिसांनी पत्रकारांना माहिती दिली.
हे माय-लेक मुस्लीम असून इस्रायल – हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला आहे. इलिनॉयमधील विल काऊंटी शेरीफच्या कार्यालयाने पीडितांच्या राष्ट्रीयवत्वाविषयी अधिक माहिती दिली नाही. परंतु,संबंधित मुलगा पॅलेस्टिनी-अमेरिकन असल्याचं अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स (CAIR) च्या शिकागो कार्यालयाने सांगितलं.