बकरी ईदनिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश करणाऱ्या एका मुस्लीम धर्मगुरूला अटक करण्यात आली आहे. मौलवी अब्दुल रहीम राठोड असं या मुस्लीम धर्मगुरूचं नाव आहे. तो अहमदाबादच्या भरुचमधील रहिवासी आहे. त्याने ‘बळीं’च्या जनावरांची यादी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर भरूच पोलिसांनी या पोस्टची दखल घेत मुस्लीम धर्मगुरूवर कारवाई केली.
हेही वाचा – Modi 3.0: गुजरातमधल्या ‘या’ मराठी खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, ‘असा’ आहे राजकीय प्रवास
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या मुस्लीम धर्मगुरूने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने बकरी ईद निमित्त दिल्या जाणाऱ्या बळीच्या जनावरांची यादी दिली होती. या यादीत त्याने म्हशी आणि उंटाबरोबरच गायीचा देखील समावेश केला होता.
मुस्लीम धर्मगुरूने ही यादी पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भरुच पोलिसांनी या पोस्टची दखल घेत मुस्लीम धर्मगुरुवर कारवाई केली. शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं भरुच पोलिसांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा – मुस्लीम महिलेला सरकारी योजनेतून घर मिळूनही हिंदू रहिवाशांचे आंदोलन, बडोद्यातील प्रकरण चर्चेत
महत्त्वाचे म्हणजे या धर्मगुरुला २०२२ मध्येदेखील अटक करण्यात आली होती. जबरदस्तीने आदिवासींचे धर्मांतरण केल्याच्या आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी तो जामीनावर बाहेर होता. दरम्यान, जनावरांची यादी पोस्ट केल्यानंतर त्याला आता पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (अ), २९५ (अ), ५०४ आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.