राम जन्मभूमी- बाबरी मशीद जमीन वादाच्या बाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने एका नवीन मोहिमेला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागो पण मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर त्यांच्या जन्मस्थानी उभारावे, असे मंचाचे म्हणणे आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंच ही संघ परिवारातील खास मुस्लिम समाजासाठी स्थापन करण्यात आलेली एकमेव संघटना आहे. मंचाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक इंद्रेश कुमार हे काम पाहतात. १५२८ मध्ये मुगल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बाकी ह्याने श्रीरामाचे जन्मस्थान असल्याची धारणा असलेल्या अयोध्येत राम मंदिराच्या जागी बाबरी मशिदीची उभारणी केल्याचे म्हटले जाते. ६ डिसेंबर १९९२ रोजी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला व त्यानंतर देशांमध्ये आणि ठिकाणी भीषण दंगलींची लाट उसळली.
“बाबर व भारतीय मुसलमान त्यांचे रक्ताचे नाते नसून, मुसलमानांचा डीएनए हा भगवान श्रीरामाशी मिळतो बाबराशी नव्हे,” असे मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल म्हणाले. हिंदुस्तानी मुसलमान हे मूळचे इथलेच असून, त्यांची मुळं (roots) ही कुठल्या अन्य देशात नसल्याचीही पुस्तीही त्यांनी जोडली.
“प्रेषित हजरत पैगंबर साहेबांनी असा दिव्य संदेश दिला आहे ही सलोखा हा युद्धापेक्षा अधिक पावन आहे. खटल्याचा निकाल कोणाच्याही बाजूने लागो, पण मुस्लिम समाजाने हिंदू सोबत सामाजिक सलोखा वाढवण्याबाबत भूमिका घ्यावी. मशीद ही कुठल्याही पर्यायी जागेवर उभारता येईल परंतु श्रीरामाचे मंदिर हे फक्त एकाच स्थानी म्हणजे राम जन्मभूमी वरच उभे राहू शकते. तिथे मंदिरच बांधलं जावं. मशिद उभारायची असेल तर ती मुस्लिम समाजाने अन्य ठिकाणी सरकारचा पैसा न घेता आपल्या कष्टाच्या व स्व अर्जित अशा संपत्तीतून बांधावी,” असेही अफझल म्हणाले.
आज जरी आम्ही रामाची पूजा करत नसलो, तरी त्याची उपासना कधी काळी आमच्या पूर्वजांनी केली होती हे विसरून चालणार नाही. कोर्टाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागो. जर हा फैसला मुस्लिम समाजाच्या बाजूने लागला तर समाजाने स्वतःहून पुढाकार घ्यावा व केंद्र सरकारला असे सांगावे या जागेवर मंदिराचे निर्माण करून हा तंटा सोडवावा… अर्थात कोर्टाचा निकाल जर हिंदूंच्या भूमिकेला धरून असला, तर राम मंदिराच्या निर्मितीसाठी मुस्लिम समाजाने सहयोग करावा, जेणेकरून ज्या वेळेला या घटनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला राम मंदिराच्या बांधकामात मुसलमानांचे हात लागले होते हे भावी पिढ्यांना कळेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
“एखाद्या मशिदीत नमाज पढण्यात आला नाही तर ती जागा आपल्या मशिद म्हणून दर्जा गमावते. ज्या ठिकाणी फसाद (दंगल किंवा हिंसा) झाला आहे, तिथे मशिद उभारता येत नाही,” असे अफजल म्हणाले.