मुस्लीम कुटुंबाच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरुन मोठ्या जमावाने या कुटुंबाला मारहाण केली. तसंच मारहाण करताना जय श्रीरामचे नारेही हा जमाव देत होता. त्यांनी या कुटुंबाच्या घरात असलेला फ्रिजही उचलून नेला. त्यामध्ये मांस ठेवलं होतं. ते गोमांस आहे असा आरोप या जमावाने केला आहे. तसंच या मुस्लीम कुटुंबाला जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत या जमावासह एक पोलीसही दिसतो आहे.

नेमकी काय आणि कुठे घडली घटना?

अचानक जय श्रीराम चे नारे देत जमाव घरात आला आणि कुटुंबाला मारहाण केल्याची ही घटना आहे. जमावाच्या या कृतीमुळे मुस्लीम कुटुंब प्रचंड घाबरलं आहे. या कुटुंबाच्या घरात असलेल्या फ्रिजमध्ये गोमांस असल्याचा संशय जमावाला होता. त्यावरुन ही मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या घरात असलेला फ्रिजही उचलून नेण्यात आला. ओडिसातल्या खोरदा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. जमाव जय श्रीरामचे नारे देत आम्हाला मारहाण करत होता असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.

हे पण वाचा- “काँग्रेसला अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार द्यायचा आहे”, योगी आदित्यनाथ यांची टीका!

ओडिशातल्या बालासोरमध्येही नुकतीच घटना

काही दिवसांपूर्वीच बकरी ईद साजरी झाली. त्यावेळीही ओडिशातल्या बालासोर या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर बालासोर या शहरातली इंटरनेट सेवा ४८ तास बंद ठेवण्यात आली होती. तसंच काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. त्या घटनेत दोन जमावांमध्ये तणाव निर्माण झाला आणि मारामारी झाली. या घटनेत १० लोक जखमी झाले होते. सोमवारी ही घटना घडली होती. त्या पाठोपाठ आता एका मुस्लीम कुटुंबाला गोमांस असल्याच्या संशयावरुन लक्ष्य करण्यात आलं आहे. फ्री प्रेस जरनलने हे वृत्त दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन

बालासोरच्या पोलीस अधीक्षक सागरिका नाथ यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. या बाचाबाची आणि वाद प्रकरणात ३४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.जातीयवादातून किंवा धार्मिक वादातून कुठल्याही चुकीच्या घटना घडू नयेत म्हणून बालासोरमध्ये पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. तसंच शहराच्या सहा प्रवेश स्थानांवरही पोलिसांचं लक्ष आहे अशीही माहिती सागरिका नाथ यांनी दिली आहे. मात्र मुस्लीम कुटुंबाला जी मारहाण करण्यात आली त्या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याबाबत नेटकरी विविध प्रतिक्रिया नोंदवत आहेत.