श्रीनगर : ‘मुत्ताहिदा मजलिस-ए-उलेमा’ (एमएमयू) या धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांच्या गटाने काश्मीरमधील शाळांत विद्यार्थ्यांना हिंदू भजन गायन करण्यास सांगितल्याच्या कथित प्रकरणी तीव्र आक्षेप घेतला आहे. मंगळवारी प्रसृत निवेदनात ‘एमएमयू’ने नमूद केले आहे, की आम्ही काश्मीरमधील शाळांत हिंदू भजन गाण्याच्या अंमलबजावणीस कडाडून विरोध करतो. कुलगाममधील सरकारी शाळेत सकाळच्या प्रार्थनेदरम्यान हिंदू भजन गायला लावण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्याचे या संघटनेने सांगितले.

या गटाने म्हटले आहे, की हे प्रकरण काश्मीरमधील मुस्लिमांसाठी अत्यंत चिंतेचे आहे. आमची धार्मिक ओळख हटवण्याचा हा प्रयत्न आहे. मुस्लीम म्हणून आमचा धर्म आणि इस्लामिक अस्मितेचे रक्षण करणे, हा आमचा मूलभूत धार्मिक हक्क आहे. त्यात सरकार, शिक्षण विभाग किंवा इतर कोणाकडूनही जाणूनबुजून हस्तक्षेप केला जाणार नाही किंवा स्वीकारला जाणार नाही. आमच्या तरुण पिढीला सरकारी शिक्षण संस्थांद्वारे धर्मत्यागास भाग करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूत्व व त्यांच्या तथाकथित एकात्मतेला गती देण्यासाठी. यासाठी जाणीवपूर्वक योजना राबवली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी या प्रकरणी टीका केली होती.

मेहबुबा मुलांच्या मनात विष कालवत आहेत : भाजप

‘पीडीपी’ अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती या प्रकरणी स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप भाजप जम्मू आणि काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी मंगळवारी केला. शाळांतील मुलांनी ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गाण्यास भाग पाडल्याची चित्रफीत प्रसृत करून मुलांच्या मनात ‘विष’ कालवले जात आहे.

Story img Loader